गून्हापूणेमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

“स्त्री म्हणून संरक्षण हवं, गुन्हेगार म्हणून सूट नको”- ॲड.जयश्री बी. सोनवणे

प्रतिनिधी नवनाथ सोनवणे पूणे दि. २६ जून २०२६ पुण्यातील लोहगडावर केतन अग्रवालचा जीव गेला. काही महिन्यांत लग्न होणार होतं. होणारी बायको सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने मिळून त्याला दरीत ढकललं. मेघालयात राजा रघुवंशीला त्याच्या बायकोनेच मारलं.
या बातम्या वाचून संताप येतो, रडू येतं. पण त्याहीपेक्षा जास्त एक प्रश्न पडतो – हे थांबणार कधी?

व्यक्ती गेली, शिक्षा झाली म्हणजे न्याय झाला का?
नाही. केतन परत येणार नाही. राजा परत येणार नाही. घरच्यांचं आयुष्यभराचं दुःख कोणतीच फाशी, कोणतीच जन्मठेप भरून काढू शकत नाही. कोर्टाने आरोपीला शिक्षा दिली म्हणजे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला असं होत नाही. मग न्याय म्हणजे काय? न्याय तोच, जेव्हा दुसरा केतन वाचेल. जेव्हा एखादी सिया किंवा सोनम गुन्हा करायच्या आधी १०० वेळा विचार करेल. शिक्षेचा उद्देश सूड नसून प्रतिबंध असतो – Deterrence.

एकाला फाशी, दहा जण वाचले – हाच न्याय
आज परिस्थिती काय आहे? खून केला तरी बेल मिळते. १०- १५ वर्षं केस चालते. साक्षीदार फितूर होतात. शेवटी पुराव्याअभावी आरोपी सुटतो. बाहेर आल्यावर तो गड जिंकल्यासारखा मिरवतो. याचा परिणाम काय? गुन्हेगाराच्या मनातली कायद्याची भीती संपली आहे. “करून बघू, काय होतंय. वकील आहे, बेल मिळेल” ही मानसिकता वाढली आहे. खून करणं म्हणजे साधी बाचाबाची झाल्यासारखं वाटतंय. जर एकाही आरोपीला ६ महिन्यात फाशी झाली, आणि ती बातमी सगळीकडे पसरली, तर दुसरा कुणी हे करायला धजावणार नाही. भीती हीच सगळ्यात मोठी शिक्षा आहे.

न्यायप्रक्रिया की अन्यायप्रक्रिया?
भारतामध्ये ५ कोटींहून अधिक खटले प्रलंबित आहेत. खून, बलात्कार सारख्या केसेसला निकाल लागायला १०-१२ वर्षं लागतात. या काळात आरोपी बेलवर मोकाट फिरतो. पीडित कुटुंब कोर्टाच्या पायऱ्या झिजवतं. न्यायाला उशीर म्हणजे न्याय नाकारणे – Justice delayed is justice denied. जोपर्यंत निकाल येत नाही, तोपर्यंत पीडितांचं दुःख संपत नाही. आणि आरोपीला वाटतं – “काही होत नाही”.

मी स्त्री आहे, पण अन्यायाची बाजू घेणार नाही
मी एक स्त्री आहे. पण म्हणून सिया गोयल किंवा सोनम रघुवंशीला पाठीशी घालणार नाही. गुन्हा करणारा पुरुष असो की स्त्री – गुन्हेगार फक्त गुन्हेगार असतो. “बाई आहे म्हणून सोडा”, “तिचं काही चुकलं असेल” असं म्हणून आपणच गुन्ह्याला खतपाणी घालतो. केतनचा जीव गेला, राजाचा जीव गेला. मारणारी बायको होती म्हणून तिची बाजू घ्यायची? नाही. स्त्री असो की पुरुष – मी आवाज उठवणार. माझं मत न्यायाच्या पारड्यात मांडणार. कारण उद्या माझा भाऊ, माझा मुलगा केतनच्या जागी असू शकतो.

“महिला सक्षमीकरण” चा गैरवापर थांबवा
आज स्त्रियांना कायद्याने संरक्षण दिलंय – ते योग्यच आहे. हुंडाबळी, घरगुती हिंसाचार थांबला पाहिजे. पण काही जणी त्या कायद्याचा गैरवापर करतात. खोट्या केसेस टाकतात, पुरुषाला ब्लॅकमेल करतात. आणि आता तर खून करायलाही लागल्या. यामुळे खऱ्या पीडित स्त्रियांचं नुकसान होतं. समाजाचा विश्वास उडतो. म्हणूनच खऱ्या स्त्रीवादीने आधी अशा सिया-सोनमचा निषेध केला पाहिजे. गुन्हेगार स्त्रीला वाचवलं तर आपण सगळ्या स्त्रियांचं नाव खराब करतो.

बेलवर सुटले की “सेलिब्रिटी” होतात – ही कुठली पद्धत?
केतन केस असो की राजा केस – आरोपी बेलवर बाहेर आले की रील्स करतात, मुलाखती देतात. लोक त्यांना भेटायला जातात. “काय डेअरिंग आहे” म्हणतात. गंभीर गुन्हा करूनही समाजात त्यांना हिरो बनवलं जातं. ही विकृती थांबली पाहिजे. खून करून बाहेर आलेल्याला पाहून जर दहशत बसण्याऐवजी कौतुक वाटत असेल, तर कायद्याचा धाक संपलाच म्हणायचा.

शाळेतच शिकवा – जीव घेणं म्हणजे काय
आज मुलांना मोबाईलवर खून, मारामाऱ्या सहज दिसतात. वेब सिरीजमध्ये गुन्हेगार हिरो असतो. त्यामुळे “एक जीव घेणं” याचं गांभीर्यच संपलंय. लहानपणापासून मुलांना शिकवलं पाहिजे – राग आला तरी हात उगारायचा नाही. नातं तुटलं तरी जीव घ्यायचा अधिकार नाही. स्त्री-पुरुष दोघांनाही. कारण सहनशीलता संपली की केतनसारखे बळी जातात.

माझी मागणी – समान न्याय, जलद न्याय
मला स्त्री म्हणून विशेष सवलत नको, आणि पुरुष म्हणून विशेष शिक्षा नको. ज्याने गुन्हा केला, त्याला शिक्षा झाली पाहिजे. खून, बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यांचा निकाल ६ महिन्यांत लागला पाहिजे. अशा केसेसमध्ये बेलचे नियम अत्यंत कडक हवेत. निकाल लागला की त्याची व्यापक प्रसिद्धी झाली पाहिजे. थंड डोक्याने, प्लॅन करून केलेला खून हा “Rarest of rare” नाही, तो “Routine” होतोय. केतनच्या आईला न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा सियाला कळेल की कायदा कुणाला सोडत नाही. राजाच्या घरच्यांना न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा सोनमसारखी दुसरी कुणी जन्माला येणार नाही.

शेवटी एव्हडच म्हणेल
मी स्त्री आहे,बहीण आहे कुणाची तरी मैत्रीण आहे.पण त्याआधी मी एक माणूस आहे. अन्याय बघून गप्प बसणं हे पाप आहे. केतन गेला, राजा गेला – अजून किती जणांचे बळी देणार? कायदा बदला, प्रक्रिया बदला, मानसिकता बदला. भीती परत आणा. कारण भीतीशिवाय शहाणपण येत नाही. आज मी केतनसाठी बोलतेय. उद्या तुमचा केतन वाचावा म्हणून बोलतीये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!