विद्यार्थी आणि पालकांच्या सातत्यपूर्ण प्रबोधनाची गरज : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा निष्कर्ष..

विशेष प्रतिनिधी चिखलदरा दि. १४ ऑगस्ट २०२६ चिखलदरा तालुक्यातील डोमा शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील काही विद्यार्थिनींना कथित ‘भूतबाधा’ झाल्याची बातमी समोर आली आणि काही काळासाठी संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कथित भूतबाधेच्या भीतीने काही विद्यार्थीनी शाळेतून आपल्या घरी निघून गेल्या आणि विद्यार्थ्यांच्या आवाजाने गजबजणारी आश्रमशाळा अचानक ओस पडली.
दिनांक १० ऑगस्ट रोजी समितीचे राज्य कार्यकारिणी पदाधिकारी नंदिनी जाधव (पुणे), प्रा. प्रवीण देशमुख (मुंबई) आणि रामभाऊ डोंगरे (नागपूर) यांनी तातडीने डोमा आश्रमशाळेला भेट दिली. मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला.
परंतु हा केवळ ‘भूतबाधेचा’ विषय म्हणून पाहण्याचा प्रश्न नव्हता.
या मुलींना नेमके काय झाले? त्यांच्या मनात भीती कशी निर्माण झाली? एका मुलीची अवस्था पाहून इतर मुलींमध्येही तशीच भीती कशी पसरली? आणि या भीतीतून त्यांना बाहेर काढून पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणायचे?
या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेतला.
केवळ काही तासांची औपचारिक भेट देऊन परत जाण्याऐवजी पथकाने मुद्दाम त्याच शाळेत रात्री मुक्काम केला. मुली ज्या वातावरणात राहतात, त्यांची निवासव्यवस्था, जेवणाची सोय, शाळेतील वातावरण आणि इतर सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
त्यानंतर ११, १२,१३ ऑगस्ट रोजी एकताई, चुनखडी, पाचडोंगरी, खडीमल आणि बुटीदा या आदिवासी गावांमध्ये पथक पोहोचले व कथित घटनेतील सर्व मुलींच्या घरी जाऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला.
मुलींशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या मनातील भीती समजून घेण्याचा प्रयत्न केला. पालकांचे म्हणणेही शांतपणे ऐकून घेतले.
या तीन दिवसांच्या प्रबोधन मोहिमेतील सर्वात भावनिक क्षण म्हणजे—ज्या मुली भीतीपोटी शाळेतून घरी परतल्या होत्या, त्या मुली आता मनमोकळेपणाने बोलू लागल्या. त्यांनी सांगितले,
“आम्हाला पुन्हा शाळेमध्ये जायचे आहे.”
पालकांनीही सांगितले,
“आम्ही मुलींना लवकरच शाळेत पाठवणार आहोत.”
ही दोन वाक्ये केवळ प्रतिक्रिया नाहीत.
ती भीतीवर मिळवलेल्या विजयाची सुरुवात आहेत.
मुलींशी संवाद साधताना त्यांनी शाळेबाबत अनेक सकारात्मक बाबी स्पष्टपणे सांगितल्या.
शाळेमध्ये सर्व सुविधा आहेत.
आम्हाला तेथे कुठलाही त्रास नाही.जेवणाची व्यवस्था चांगली आहे.शिक्षक प्रेमाने वागवतात. शिकवलेले समजते इत्यादी.
ही विधाने अत्यंत महत्त्वाची आहेत. कारण कोणत्याही घटनेचे स्वरूप समजून घेताना विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष अनुभव ऐकणे आणि सर्व बाजू समजून घेणे गरजेचे आहे.
एका मुलीची भीती… आणि त्यातून निर्माण झालेली सामूहिक भीती
समितीच्या प्राथमिक पाहणीत असे दिसून आले की, सुरुवातीला एका मुलीला काही त्रास झाला. तिची अवस्था पाहून तिला “भुताने झपाटले” अशी भीती निर्माण झाली.
आणि मग त्या भीतीची साखळी पुढे सरकली.
एका मुलीची अवस्था पाहून इतर मुलीही घाबरल्या. त्यानंतर काही मुलींमध्ये त्याच प्रकारच्या प्रतिक्रिया दिसून आल्या. भीतीच्या वातावरणात असंबद्ध बोलणे, हातवारे करणे अशा प्रतिक्रिया देखील निदर्शनास आल्या.
या घटनेकडे सामूहिक भीती किंवा सामूहिक मानसिक प्रतिक्रिया (मास हिस्टेरिया)
या दृष्टीनेही पाहणे आवश्यक आहे.
कारण ही भीती संसर्गासारखी पसरू शकते.
जेव्हा त्या भीतीला आधीपासून असलेल्या भूत-प्रेताच्या अंधविश्वासाची जोड मिळते, तेव्हा साध्या किंवा अनाकलनीय वाटणाऱ्या घटनेलाही ‘भूतबाधे’चे रूप दिले जाऊ शकते.
भयपटांच्या प्रतिमा आणि मनातील भीती
मुलींशी मनमोकळेपणाने संवाद साधताना त्यांनी सांगितले की, शाळेच्या दोन महिन्यांच्या सुट्टी दरम्यान काही भयपट अर्थात हॉरर चित्रपट त्यांनी पाहिले होते.
त्यात विशेषतः ‘कांचना २’ या चित्रपटाचा उल्लेख काही मुलींनी केला. हॉस्टेल मध्येही या चित्रपटाची चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
भयपट पाहणे हे स्वतःमध्ये अंधश्रद्धेचे कारण नाही. मात्र भीती निर्माण करणाऱ्या प्रतिमा आणि कथांचा मनावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः आधीपासूनच भूत-प्रेताविषयीच्या समजुती असतील, तर एखाद्या वास्तविक घटनेचा अर्थ लावताना त्या भीतीचा प्रभाव पडू शकतो.
या प्रकरणाने आदिवासी पाड्यांमध्ये असलेला ‘भुमका’ (भगत )चा प्रभाव हा अंधश्रद्धा पसरविणारा एका महत्त्वाच्या घटक असल्याचे निरीक्षण समितीने नोंदविले.
आजारपण, मानसिक त्रास किंवा अनाकलनीय वाटणारी शारीरिक-मानसिक लक्षणे दिसली की अनेकदा प्रथम डॉक्टरांकडे जाण्याऐवजी भूमकाकडे (भगत) जाण्याची प्रवृत्ती दिसून येते.
या अंधश्रद्धांमागे अनेक वर्षांची सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे केवळ दोष देऊन हा प्रश्न सुटणार नाही.
त्यासाठी सातत्यपूर्ण, संवेदनशील आणि स्थानिक पातळीवरचे प्रबोधन आवश्यक आहे.
या कथीत भूतबाधा झालेल्या सर्व मुलींच्या घरी भेट दिल्यानंतर एक-दोन मुलींचा अपवाद वगळता बाकी सर्व मुली अतिशय स्वस्थ आणि सामान्य स्थितीत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे केवळ ‘भूत नसते’ एवढे सांगणे नव्हे
अंधश्रद्धा अनेकदा पिढ्यान्पिढ्या मनात रुजलेल्या भीतीतून, परंपरांतून, सामाजिक परिस्थितीतून आणि अपुऱ्या माहितीमधून तयार होतात.
म्हणून प्रबोधनही सातत्याने करावे लागते.
विद्यार्थ्यांचे पालकांचे शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रबोधन हवे.
अंधश्रद्धा केवळ अज्ञानातून जन्म घेत नाही.
ती कधी भीतीतून जन्म घेते.
अफवांमधून पसरते.
परंपरांच्या आधारावर वाढते.
आणि प्रश्न विचारण्याची सवय नसल्यामुळे अधिक मजबूत होते.
तीन दिवसांच्या या प्रवासाच्या शेवटी मनात सर्वाधिक समाधानाची भावना निर्माण करणारी गोष्ट म्हणजे—त्या सर्व मुली पुन्हा शाळेत जाण्यास तयार आहेत.
भीतीच्या सावलीतून पुन्हा शाळेच्या दिशेने निघालेल्या मुलींच्या डोळ्यांत भविष्याची स्वप्नं पाहत पुन्हा वाटचाल सुरू होणार आहे.
या विषया संदर्भात सविस्तर महिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रवीण देशमुखसर यांनी दिली.










