अभिवादनउत्सवदेश-विदेशमहाराष्ट्रशहरशुभेच्छासामाजिक

स्वातंत्र्याचा खरा अर्थ…. status पुरता की आयुष्यात कायमचा?- ॲड.जयश्री बी. सोनवणे

प्रतिनिधी नवनाथ बी. सोनवणे १९ ऑगस्ट २०२६ नुकताच सजरा झालेला Independence Day १५ ऑगस्ट आला की आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर तिरंगा दिसू लागतो. सगळेच Status ठेवतात – “Happy Independence Day”. डीपीला तिरंग्याची फ्रेम लागते. देशभक्तीचे संदेश फॉरवर्ड होतात.

पण एकदा शांतपणे स्वतःलाच विचारून बघूया…
देशाला स्वतंत्र मिळून ७९ वर्षे झाली. १९४७ पासून आज २०२६ पर्यंतचा आपला प्रवास खूप मोठा आहे. चंद्रावर झेंडा फडकवला, जगात नाव कमावलं. पण या ८० वर्षात देशात राहणारा प्रत्येक माणूस खरंच स्वतंत्र झाला आहे का?

आजही कित्येक घरांत मुलीला तिच्या मनाप्रमाणे करिअर निवडण्याचं, कपडे घालण्याचं, लग्नाचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही. “लोक काय म्हणतील” या एका वाक्यात तिची स्वप्नं बांधली जातात.

लाखो विद्यार्थी आहेत जे वर्षानुवर्षे मेहनत करून शिक्षण घेतात. डिग्री हात येते, पण हाताला काम नाही. नोकरीच्या शोधात स्पर्धा परीक्षांच्या रांगा लांबत चालल्यात. त्यांच्या डोळ्यातील स्वप्नं हळूहळू विझत चालली आहेत.

शेतकरी… ज्याच्या कष्टावर आपला देश उभा आहे. तो दिवसरात्र राबतो, उन्हातान्हात शेत पिकवतो. पण त्याच्या घामाला योग्य भाव मिळतो का? कर्जाच्या ओझ्याखाली त्याचं स्वातंत्र्य कधीच गहाण पडलं आहे.

आणि आपण? आपण आजही जात, धर्म, भाषा याच्या नावावर एकमेकांपासून दूर जातोय. सोशल मीडियावर भांडतोय. माणूस म्हणून माणसाला स्वीकारायचं स्वातंत्र्य आपण अजून कमावलं नाही.

*खरंच कसा साजरा करू हा ‘स्वातंत्र्यदिन’,* 
*जेव्हा रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना मुलींच्या मनात आजही भीतीचा थरकाप असतो?* 
*स्टेटसवर तिरंगा ठेवला, गाणी वाजवली…* 
*झाला ना ‘स्वातंत्र्यदिन’ साजरा?* 

*देश तर 5G च्या वेगाने पुढे धावतोय,* 
*पण महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत विचार अजूनही मध्ययुगातच अडकलेत!* 
*शिक्षणाचा आव आणला, समानतेच्या गप्पा मारल्या…* 
*पण प्रत्यक्षात सन्मान द्यायला मात्र सोयीस्करपणे विसरलो!* 

*म्हणूनच विचारावंसं वाटतं,* 
*फक्त कॅलेंडरवरची तारीख बदलली,* 
*म्हणजे आपण खरोखर ‘स्वतंत्र’ झालो का?*

मग खरा प्रश्न हाच आहे –
देश स्वतंत्र झाला, पण आपण?आपण आपल्या भीतीपासून स्वतंत्र झालो का? अपयशाच्या विचारांपासून? लोकांच्या टिप्पण्यांच्या गुलामगिरीपासून?

तिरंग्याला सलाम करताना संविधानालाही तितकाच मान द्या, कारण स्वातंत्र्याला टिकवून ठेवण्याची ताकद संविधानात आहे! देश स्वतंत्र झाला म्हणून स्वातंत्र्य टिकत नाही, ते टिकवण्यासाठी संविधान, समानता, स्वातंत्र्य आणि न्याय जपावा लागतो! 
तिरंग्याला सलाम करणारे हात संविधानाच्या मूल्यांसाठीही उभे राहिले पाहिजेत!

तिरंगा लावा, नक्की लावा. तो आपल्या अभिमानाचं प्रतीक आहे. भगवा शौर्याचा, पांढरा शांतीचा आणि हिरवा समृद्धीचा संदेश देतो. अशोक चक्र आपल्याला २४ तास कर्तव्याची आठवण करून देतं.

पण स्वातंत्र्याचा उत्सव फक्त एका दिवसापुरता, फक्त Status पुरता मर्यादित राहिला तर त्याला अर्थ काय?

खरं स्वातंत्र्य तेव्हा असेल जेव्हा: प्रत्येक मुलीला पंख मिळतील आणि ती आकाशात उडेल,प्रत्येक तरुणाला त्याच्या शिक्षणाचा मोबदला मिळेल,प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान असेल,आणि माणूस माणसाला माणूस म्हणून जगू देईल.

चला या १५ ऑगस्टला फक्त झेंडा वंदनच नाही, तर स्वतःला एक वचन देऊया.
देश घडवण्याची जबाबदारी फक्त सरकारची नाही, ती आपलीही आहे.

कारण स्वातंत्र्य हा फक्त उत्सव नाही… 
ती प्रत्येकाच्या आयुष्यात दिसली पाहिजे अशी जबाबदारी आहे._
जय हिंद! वंदे मातरम्! 🇮🇳

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button