अभिवादनअमरावतीमहाराष्ट्रविशेषसामाजिक

जनतेच्या प्रश्नासाठी सतत संघर्ष करणारे खंबीर नेतृत्व माजी आमदार प्रा.बी.टी.उपाख्य भाऊराव तुळशीराम देशमुख..


प्रतिनिधी अमरावती दि. २२ ऑगस्ट २०२६ माजी आमदार प्रा.बी.टी.उपाख्य भाऊराव तुळशीराम देशमुख यांच्या दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ८७व्या जयंतीनिमित्त साहित्यिक व अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत .

*“प्रा.बी.टी.देशमुख संवैधानिक मार्गाने लढा देणारे लढवय्ये”*

           शिक्षण विश्वातील एक दीपस्तंभ, एक थोर विचारवंत व मार्गदर्शक, आयुष्याचा प्रत्येक क्षण जनहितासाठी खर्च करणारे, विधिमंडळातील एक अभ्यासू व खंदे लोकप्रतिनिधी, राजकीय व सामाजिक जीवनात नीतीमत्ता कायम ठेवणारे एक प्रगल्भ व ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्त्व, संवैधानिक मार्गाने लढा देणारे लढवय्ये, पाण्यासाठी जन आंदोलन करणारे एक खंबीर नेतृत्व, मृत्यूनंतर नेत्रदान करून मरणानंतरही जग बघणारे नेत्रदानी, संपूर्ण राज्यातील शैक्षणिक प्रश्न व विदर्भाच्या सिंचनाच्या अनुशेषावर सभागृह गाजविणारे एका अभ्यासू व उत्कृष्ट संसदपटू, जनतेच्या प्रश्नासाठी सतत संघर्ष करणारे खंबीर नेतृत्व माजी आमदार प्रा.बी.टी.उपाख्य भाऊराव तुळशीराम देशमुख दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी असलेल्या ८७ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥
    प्रा.बी.टी.उपाख्य भाऊराव तुळशीराम देशमुख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा येथे दि. २१ ऑगस्ट १९३९ रोजी झाला तर दि. १९ जून २०२६ ला ते अनंतात विलीन झाले. ते अमरावती पदवीधर मतदार संघाचे  सलग ६ वेळा आमदार राहिले आहेत.
     प्रा.बी.टी. देशमुख यांनी नागपूर विद्यापीठांतर्गत विदर्भ महाविद्यालय, अमरावती येथून १९६२ मध्ये बी.ए. आणि १९६४ मध्ये राज्यशास्त्र विषयात एम.ए. ची पदवी पूर्ण केली. नागपूर युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशनचे ते संस्थापक अध्यक्ष होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या स्थापनेत त्यांचे योगदान होते. शासनाला अनेक शैक्षणिक सुधारणा करण्यास बाध्य करून शिक्षकांच्या अनेक समस्या त्यांनी सोडविल्या. विशेष म्हणजे अन्य विदर्भाच्या सिंचनासह क्षेत्रातल्या अनुशेषाचा मुद्दा त्यांनी अभ्यासपूर्ण समोर आणला होता. विदर्भाचा उर्वरीत महाराष्ट्राच्या तुलनेत सर्वच क्षेत्रातला विकासाचा अनुशेष किती तीव्र आहे, या संदर्भात त्यांनी सखोल मांडणी वेळोवेळी केली तेव्हा शासनालाही त्याची दखल घ्यावी लागली होती. अमरावती शहरासह अन्य शेकडो गावांची तृष्णातृप्ती करणारे अप्पर वर्धा धरणाच्या निर्मितीत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. पेढी धरणासाठी त्यांचा आग्रह होता. नैतिकता जोपासून त्यांनी अखेरपर्यंत कार्य केले. अनेकांच्या ते आदर्शस्थानी होते.प्रा.भाऊराव तुळशीरामजी देशमुख हे  विदर्भातील शिक्षक चळवळीचे नेते, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि अमरावती पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार (आमदार, महाराष्ट्र विधान परिषद) होते. विधिमंडळात शिक्षकांच्या आणि प्राध्यापकांच्या हक्कांचा बुलंद आवाज उठवणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. विधिमंडळात ते जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी उभे राहत, तेव्हा त्यांच्याकडे प्रत्येक विषयाची फाईल, अचूक कागदपत्रे आणि पूर्वतयारी असे. त्यांच्या या अभ्यासपूर्ण आणि आक्रमक शैलीमुळे सरकारला नेहमीच विचारपूर्वक उत्तरे द्यावी लागत.

बी.टी.देशमुख ।
गाढे अभ्यासक ॥
आमदार एक ।
प्रज्ञावंत ॥

ते उत्कृष्ट संसदपटू होते. शिक्षकांच्या आणि उच्च शिक्षणाच्या काही प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघत नसल्याचे पाहून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.
        शिक्षक चळवळ आणि ‘नुटा’ (NUTA) मधील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.प्रा.बी.टी. देशमुख हे विदर्भातील महाविद्यालयीन प्राध्यापकांची संघटना ‘नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन’ (NUTA – नुटा) चे मुख्य आधारस्तंभ आणि नेते होते.प्राध्यापकांचे वेतन, कंत्राटी शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक स्वायत्तता आणि विद्यापीठीय सुधारणांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या या योगदानामुळे त्यांना “शिक्षक चळवळीचा महामेरू” असे म्हटले जायचे.त्यांच्या या महान कार्याची दखल घेऊन वर्धा येथील ‘इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज’ मधील सभागृहाचे नाव ‘प्रा.बी.टी.देशमुख सभागृह’ असे ठेवण्यात आले आहे.प्रा.बी.टी. देशमुख यांना नागपूर येथे सेंट्रल इंडिया फाउंडेशन तर्फे ” डॉ.श्रीकांत जिचकार स्मृती ज्ञानयोगी पुरस्कार ” बहाल करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचा ‘खरे ज्ञानयोगी’ असा गौरव केला होता. तसेच राष्ट्रकुल संसद परिषदेचा पहिला ” उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार ” दि.१६ डिसेंबर १९९६ रोजी त्यांना बहाल करण्यात आला होता.

एक दीपस्तंभ ।
बी.टी.देशमुख ॥
सर्वांनाच सुख ।
तयांमुळे ॥

सिंचन अनुशेषाच्या लढ्यातील मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील एका अभ्यासू आणि निस्पृह संसदीय पर्वाचा अंत झाला आहे. सलग तीन दशके विधान परिषदेत शिक्षकांचे आणि पदवीधरांचे अचूक प्रतिनिधित्व करणारे डॉ. देशमुख ‘नुटा’ (NUTA) संघटनेचे शिल्पकार होते. सभागृहात केवळ आकडेवारी आणि पुराव्यांच्या आधारे सरकारला धारेवर धरण्याचे त्यांचे कसब अद्वितीय होते. विदर्भाच्या सिंचन अनुशेषाचा प्रश्न राज्य पातळीवर मांडून त्यांनी या भागाला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला.

दिली नवी दिशा ।
शिक्षण क्षेत्राला ॥
सिंचन क्षेत्राला ।
बीटींनीच ॥

             सन : १९५७ पासून अमरावतीच्या दैनिक हिंदुस्थान या लोकप्रिय वृत्तपत्रात पत्रकार म्हणून प्रा. बी.टी. देशमुख यांचा सुरू झालेला प्रवास पुढे प्राध्यापक आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार होण्यात झाला.अमरावती विद्यापीठाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेणाऱ्यांमध्ये आणि त्यावर विधिमंडळात संघर्ष करणाऱ्यांमध्ये प्रा. बी.टी. देशमुख यांचा समावेश होता.
‘नुटा’ या संघटनेचे अधिकृत द्विसाप्ताहिक मुखपत्र म्हणून नुटा बुलेटीनने गेल्या पन्नास वर्षांत उच्च शिक्षण क्षेत्रातील असंख्य प्रश्न, संघर्ष आणि परिवर्तनांची नोंद प्रामाणिकपणे जतन केली आहे. शिक्षकांच्या सेवाशर्ती, वेतन आयोग, विद्यापीठीय कायदे, पेन्शन, शासकीय निर्णय, न्यायालयीन निकाल आणि विविध शैक्षणिक धोरणांबाबत अधिकृत व अभ्यासपूर्ण माहिती देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या बुलेटीनने सातत्याने केले आहे.आजच्या डिजिटल युगात माहितीचे आदान-प्रदान सहज शक्य असले तरी १९७० च्या दशकात शिक्षक संघटनांसमोर संवादाची गंभीर समस्या होती. शिक्षकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी आणि शासनाच्या धोरणांचे विश्लेषण करण्यासाठी स्वतंत्र माध्यमाची गरज प्रकर्षाने जाणवत होती. या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट १९७७ रोजी नुटा बुलेटीनचा पहिला मुद्रित अंक प्रकाशित झाला होता. ५० वर्षांहून अधिक काळ प्राध्यापक आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी तसेच शैक्षणिक सुधारणांसाठी त्यांनी कार्य केले. ‘नुटा’ बुलेटिनच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक विषयांवर आवाज उठवला. येत्या २१ जून रोजी ‘नुटा’ बुलेटिनचा सुवर्णमहोत्सव साजरा होणार होता,पण त्याआधीच प्रा.बी. टी.देशमुख यांनी जगाचा निरोप घेतला.त्यांच्या निधनाने अमरावतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक अभ्यासू व प्रेरणादायी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. शिक्षक चळवळीचे महामेरू,सिंचन अनुशेष निर्मूलन महर्षी व उत्कृष्ट संसदपटू असलेल्या प्रा.बी.टी.देशमुख यांच्या
दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी असलेल्या ८७ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥

बी.टीं.ना करितो ।
आज जन्मदिनी ॥
वंदन करांनी ।
कोटी कोटी ॥
   
समाजभूषण पुरस्कार प्राप्त
      साहित्यिक व अभंगकार
        प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button