पूणेमहाराष्ट्रविशेषशोध इतिहासाचा..सामाजिक

किल्ले सिंहगडावरील रोपवेला शिव-शंभुभक्तांचा तीव्र विरोध ;

स्थानिक ग्रामस्थ व गडदुर्ग संवर्धन संघटनांचा आंदोलनाचा इशारा ;

प्रतिनिधि पुणे दि. १७ आक्टोबर २०२६ घेरा सिंहगड, ता. हवेली, जि. पुणे येथील जगप्रसिद्ध कोंढाणा गिरीदुर्गावर म्हणजेच स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे सरदार नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंच्या वीर बलिदाना बद्दल शिवछत्रपतींच्या वाणीतून गड आला, पण सिंह गेला.. असे ऐतिहासिक गौरोदगार् निघाले, अशा इको सेन्सिटिव्ह झोन अंतर्गत डोंगररांगेत वसलेल्या किल्ले सिंहगडावर होत असलेल्या नियोजित खाजगी रोपवेच्या कामास तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत घेरा सिंहगड, आजी माजी सरपंच, ग्रामस्थांसह विविध गडकिल्ले प्रेमी संघटना व गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केली आहे.

दि.८ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे श्रमिक पत्रकार संघ भवनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना घेरा सिंहगड ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच, गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी, रायगड सेवा समिती, ऐतिहासिक वंशज घराणे संघटना, शंभुसेना संघटना आदींच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्प्ष्ट व प्रखर विचार मांडले. पत्रकार परिषदेत बोलताना गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संस्थेचे अध्यक्ष व नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे म्हणाले की, किल्ले सिंहगडावरील कामास प्रशासनाची निव्वळ कागदोपत्री फसवी मंजूरी मिळाली असली तरी तसेच काही अंशी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली असली तरी सदर खासगी रोपवेचे काम तात्काळ थांबविण्यात यावे. कारण संबंधित कामास स्थानिक घेरा सिंहगड ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव दिला नसून २००४ साली स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असताना व सरपंचांच्या सही शिवाय फक्त ग्रामसेवकाच्या संगनमताने परस्पर मासिक सभेच्या तकलादु ठरावावर प्रशासनाने संबंधित खाजगी व्यक्तिला परवानगी दिल्याने तसेच सिंहगड हे ठिकाण इको सेन्सिटिव्ह झोन अंतर्गत येत असल्याने नियोजित खाजगी रोपवे कायमचा रद्द व्हावा अशी मागणी केली आहे.

तसेच रायगड सेवा समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष निलेश पवार, सिंहगड घेरा गावचे माजी सरपंच पांडुरंग सुपेकर, कोंढनपूर गावचे माजी सरपंच विश्वनाथ मुजुमले, सिंहगड घेराचे माजी सरपंच अमोल पढेर आदी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत आपली प्रखर भूमिका मांडल्या. सरपंच बोलताना म्हणाले की, सरकार असो की प्रशासन गावात कोणतेही काम करताना संबंधित कामास ग्रामसभेची मान्यता व तसा सकारात्मक ठराव घ्यावा लागतो परंतु सदर कामास असा कोणताही ठराव नसल्याने काम कायमचे बंद करावे, कारण किल्ले सिंहगड हे ऐतिहासिक ठिकाण असून या पवित्र शौर्यभूमीवर स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे तसेच नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरे यांचे समाधी स्थळ आहे.

पुढे बोलताना सरपंच म्हणाले की, (पोलादपूर रायगड) रोहा येथील कोतवाल गावची जमीन गट नं. ८२४ मधील क्षेत्र १.०४ हेक्टर जागा संबंधित वादग्रस्त खाजगी रोपवे करणाऱ्याकडून वनविभागाला देण्यात आली आणि त्याबदल्यात किल्ले सिंहगडावरील फॉरेस्ट स.न. ३२१ मधील गट नं. ३२३, २६७ ,२६१ एकूण क्षेत्र ९३ गुंठे जागा खासगी रोपवे करणाऱ्या व्यक्तीला रोपवेसाठी कोणत्या नियमाने देण्यात आली आहे. खाजगी लोकांना गडकिल्ले दिल्याने तिथे पंचतारांकित हॉटेल, लॉज बांधले जाणार आहेत. अशा चुकीच्या धोरणामुळे गडावर भविष्यात रेव्ह पार्ट्या, दारू पार्ट्या तसेच आमली पदार्थांचे सेवन केले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणून रोपवेचे काम कायमचे रद्द व्हावे व राज्यातील गडकिल्ल्यांचे खासगीरकर करू नये अशी मागणी सरकारकडे केली आहे.

छत्रपतींच्या स्वराज्यातील प्रत्येक गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन व्हावे या उद्देशाने शिव-शंभु छत्रपतींच्या राजघराण्यातील सर्व वंशज राजघराणे तसेच छत्रपतींच्या जवळील सर्व नातेवाईक वंशज राजघराणे, स्वराज्यातील सर्व सरदार घराणे व शूरवीर मावळ्यांच्या घराण्यातील वंशज घराण्यांनी एकत्र येऊन शिव- शंभुभक्ता सोबत घेऊन ” गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य” या संस्थेची स्थापना केली असून संघटन संस्थेचे संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून तंजावरचे श्रीमंत शिवाजीराजे भोसले, सातारा गादीचे छत्रपती उदयनराजे भोसले, कोल्हापुर गादीचे श्रीमंत संभाजीराजे छत्रपती, नागपुरचे श्रीमंत मुधोजीराजे भोसले, नागपुरचे युवराज श्रीमंत जयसिंगराजे भोसले यांचा समावेश असुन अध्यक्ष पदी सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशंज सुभेदार कुणालजी मालुसरे तर कार्याध्यक्ष पदी स्वराज्यनिष्ठ राजेशिर्के घराण्यातील महाराणी येसुबाईंचे वडील राजे पिलाजीराव राजेशिर्के यांचे वंशज शंभुसेना प्रमुख श्रीमंत दिपकराजे शिर्के आहेत.

प्रसिद्ध प्रमुख व प्रवक्ते पदी इतिहास अभ्यासक व पत्रकार श्रीमंत लक्ष्मीकांत राजेशिर्के असून उपाध्यक्ष पदी धाराऊ माता गाडे यांचे वंशज सरनौबत अमितदादा गाडे पाटील, सचिव पदी सरदार हैबतराव शिळीमकर यांचे वंशज मंगेशदादा शिळीमकर, विश्वस्त पदी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज संदीपदादा मोहिते पाटील, सरनौबत येसाजी कंक यांचे वंशज रवींद्रजी कंक, सचिनदादा भोसले, राजेंद्र मोहिते, पासलकर, घोरपडे, जाधवराव, निंबाळकर, गायकवाड, जगताप, इंदलकर, बांदल, सनस, गोळे आदि घराणे, इतिहास संशोधक, किल्ले अभ्यासक, लेखकांसह अन्य ऐतिहासिक घराण्यातील मान्यवरांचा ही सहभाग असल्याने आता सिंहगड रोपवे वादग्रस्त प्रकरणात थेट गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संघटनेनेच उडी घेतल्याने स्थानिक नागरिकांना मोठे बळ मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button