झुरळं जनता पार्टीचे ०६ जून रोजी पिंपरीत ‘बेरोजगार एल्गार’ धरणे आंदोलन..

तरुणांच्या १० न्याय्य मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०७ जून २०२६ पिंपरी चिंचवड शहरातील लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘झुरळं जनता पार्टी’ तर्फे दि. ०६ जून २०२६, शनिवार रोजी सकाळी १० ते सायं ०५ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे ‘बेरोजगार एल्गार’ धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले.
या आंदोलनाची पूर्वसूचना व १० प्रमुख मागण्यांचे निवेदन ०५ जून रोजी मा. तहसीलदार, हवेली तालुका, पिंपरी चिंचवड यांना सादर करण्यात आले.
‘झुरळं जनता पार्टी’चे संस्थापक मा. अभिजीत दीपके यांनी सांगितले की, “पेपरफुटीमुळे हजारो तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. भरती रखडल्या आहेत. वय निघून चालले आहे. घरात ‘बेरोजगार’ म्हणून हिणवले जात आहे. आता गप्प बसून चालणार नाही. शांततामय लोकशाही मार्गाने आम्ही आमचा हक्क मागणार आहोत.”
आंदोलनातील प्रमुख १० मागण्या:
१. जबाबदारी निश्चित करा: पेपरफुटीला जबाबदार यंत्रणेवर कठोर कारवाई करून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
२. कठोर शिक्षा: पेपरफोड्यांवर MCOCA अंतर्गत कारवाई करून १० वर्ष शिक्षा व १० लाख दंड ठोठवावा.
३. त्वरित भरती: केंद्र व राज्य शासनाच्या सर्व रिक्त जागा ६ महिन्यात भराव्यात.
४. बेरोजगार भत्ता: १८ ते ३५ वयोगटातील सर्व बेरोजगारांना दरमहा ₹ ५००० भत्ता सुरू करावा.
५. परीक्षा फी माफ: MPSC, पोलीस, शिक्षक भरतीसह सर्व स्पर्धा परीक्षांची फी पूर्णपणे माफ करावी.
६. कायमस्वरूपी नोकऱ्या: कंत्राटी भरती पद्धत रद्द करून कायमस्वरूपी नोकरभरती करावी.
७. तक्रार हेल्पलाईन: भरतीतील घोटाळ्यांसाठी २४x७ हेल्पलाईन सुरू करावी.
८. स्किल + नोकरी: सर्व बेरोजगारांना नोकरीची हमी असलेले मोफत कौशल्य प्रशिक्षण द्यावे.
९. आंदोलनाचा हक्क: शांततामय आंदोलन करण्याचा घटनात्मक हक्क अबाधित ठेवावा.
१०. संरक्षण द्या: आंदोलनाचे नेतृत्व करणारे मा. अभिजीत दीपके यांना योग्य पोलीस संरक्षण द्यावे.
“हे आंदोलन १००% शांततेत व कायद्याचे पालन करत सुरू झाले. झेंडे, बॅनर घेऊन या वेळी युवक आले होते. एक दिवस स्वतःसाठी द्या. नोकरी नसेल, पेपर फुटला असेल, भविष्य वाचवायचे असेल तर तरुणांनी एकत्र यायला हवे असे आवाहन झुरळं जनता पार्टीने यावेळी केले.
‘नोकरी नाही तर मतदान नाही’ हा नारा देत आंदोलनाला सुरुवात झाली. हे आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे संपन्न झाले यावेळी असंख्य युवक उपस्थीत होते.



