आदिवासी आश्रमशाळा वसतिगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद झाला.. शरद पवार

प्रतिनीधी- नाशिक येथील देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी आदिवासी आश्रमशाळा इमारत व मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामाचे काम हाती घेतले आहे. या उपक्रमाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद झाला.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी देवळाली मतदारसंघात आलो होतो. सरोजताईंना मोठ्या मतांनी निवडून द्या, आपल्या घरातील मुलगी आहे, इथे अत्यंत प्रेमळ भावनेने लक्ष देण्याची भूमिका त्यांच्याकडून घेतली जाईल, हे मी आग्रहाने सांगितले होते. मला आनंद आहे की तुम्ही त्यांना मोठ्या मताने विधानसभेत पाठवले. एखाद्या कर्तृत्ववान, अभ्यासू व्यक्तीला लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर विकासकामात बदल होतो. तो बदल आज देवळाली मतदारसंघात दिसतोय.
नाशिक हा राज्यातील उत्तम शेती करणारा जिल्हा आहे. फळबाग, भाजीपाला व अन्य गोष्टींमध्ये नाशिक जिल्हा पुढे आहे. इथे साखर कारखानदारी झाली. दुर्दैवाने इथला नाशिक सहकारी साखर कारखाना बंद पडला. हा कारखाना सुरु करण्याचे प्रयत्न करताना सरोजताई जेव्हा माझ्याकडे आल्या तेव्हा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कारखान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. नाशिक सहकारी साखर कारखाना लवकरच सुरु होईल असा विश्वास मला आहे. यातून ज्या शेतकऱ्यांनी ऊसाचे पीक घेतले असेल त्यांना दोन पैसे अधिकचे मिळतील.
आदिवासींसाठी चांगली आश्रमशाळा, चांगले वसतीगृह, वीजेची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय हवी. सरोजताईंनी महाराष्ट्र सरकारकडून त्यासाठी लागणारी रक्कम मंजूर करून आणली आणि आज सर्वांच्या उपस्थितीत या सर्व कामांचे भूमिपूजन आपण केले. माझी खात्री आहे की येत्या दोन वर्षांत या गोष्टी उभ्या राहून आदिवासी मुला-मुलींना एक चांगली सुविधा मिळेल.
आपण सर्वजण शेती करणारे लोक असलो तरी आज ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. नाशिक जिल्हा राज्यात उत्तम शेती करणारा जिल्हा असून या भागातून देशपातळीवर कांदा, द्राक्ष, डाळींब, टॉमॅटो पाठवले जातात. या सगळ्याच्या मागे सरकार उभे राहिले आणि मदत केली तर माझी खात्री आहे की केवळ महाराष्ट्राची नाही तर देशाची गरज आपण भागवू आणि देशाच्या बाहेर शेतमाल पाठवू. दुर्दैवाने ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांचे धोरण निर्यातीला नाही तर आयातीला प्रोत्साहन देणारे आहे. हे धोरण बदलावे म्हणून शेतकरी हिताच्या विरुद्ध धोरण आखणारे जे राज्यकर्ते असतील त्यांना बाजूला करण्याचे काम आपल्याला करावे लागेल.
तुमच्या विकासकामांचा प्रश्न असतो तेव्हा सत्ता हाती नसली तरीही विविध मार्गांनी आपले प्रश्न सोडवून घ्यायचे तंत्र आम्हाला माहिती आहे. त्याचा वापर करून, तुम्हाला साथ देऊन, तुमचे जीवन कसे बदलेल यादृष्टीने काळजी घेऊ. असे यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलले.




