
प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. ११ जून २०२६ स्वस्त सोयीपेक्षा आरोग्य महत्वाचे आहे. राज्यभरातील हॉटेल, टपऱ्या आणि खाद्यगाड्यांना FDA चा कडक इशारा; नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तयारी.
रस्त्याच्या कडेला मिळणारा गरमागरम वडापाव, चटकदार भेळ, कुरकुरीत भजी किंवा समोसा वर्तमानपत्राच्या कागदावर घेऊन खाणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. अन्नपदार्थ वाढण्यासाठी किंवा बांधण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात आता कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष मोहीम हाती घेतली आहे.
FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न विक्रेत्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले आहे की, अन्नपदार्थ थेट वर्तमानपत्राच्या कागदात देणे किंवा गुंडाळणे हे अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन असून ग्राहकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारे आहे. नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
‘वर्तमानपत्राचा कागद धोकादायक का?
तज्ज्ञांच्या मते, वर्तमानपत्र छापण्यासाठी वापरली जाणारी शाई, रंगद्रव्ये आणि विविध रासायनिक घटक अन्नाच्या संपर्कात आल्यास ते अन्नात मिसळू शकतात. विशेषतः गरम, तेलकट किंवा ओलसर पदार्थांमध्ये ही रसायने अधिक वेगाने झिरपण्याची शक्यता असते. त्यामुळे पचनसंस्थेचे विकार, दीर्घकालीन आरोग्य समस्या आणि इतर दुष्परिणाम उद्भवू शकतात.
अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून विविध शहरांतील हॉटेल्स, फास्टफूड सेंटर, टपऱ्या आणि खाद्यगाड्यांची तपासणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर दंड, परवाना रद्द करणे किंवा इतर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते
‘ग्राहकांनी सतर्क रहावे ‘
प्रशासनाने नागरिकांनाही आवाहन केले आहे की ,
कोणताही खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदावर दिला जात असल्यास त्यास नकार द्यावा. सुरक्षित आणि अन्नसुरक्षा
मानकांनूसार पार्सलचा आग्रह धरावा. ग्राहकांच्या जागरुकतेमुळेच अशा धोकादायक पध्दतींना पूर्णविराम मिळू शकतो.
“वर्षानुवर्षे वडापाव आणि भजी वर्तमानपत्रात मिळतात. मात्र त्याचा आरोग्यावर होणारे परिणाम आता समोर येत आहेत. प्रशासनाची ही मोहीम स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
महत्वाचे- गरम अन्न वर्तमानपत्रात घेऊ नका, अन्न सुरक्षित पार्सलचा आग्रह धरावा, नियम मोडणार्यां विक्रेत्यांची तक्रार करा, स्वतःची आणि कुटुंबाची आरोग्यसुरक्षा जपा. वर्तमानपत्राच्या शाहीत केमिकल असते, जेव्हा खाद्य पदार्थ बांधून देतात तेव्हा ती शाही पदार्थाला चिटकून पोटात जाते आणि हळूहळू त्याचे परिणाम शरीरावर होतात असे तपासातून तज्ञ व FDA यांनी दिली आहे.
आरोग्याशी खेळ आता बंद होणार,
मग आपणही सावधपणाचा पवित्रा घेणे जरूरीचे आहे.”शरीर स्वस्थ तर आपण ही मस्त”!



