सावरगाव विद्यालयातील बारावीच्या शेतकरी कन्यांनी घेतली गरुडभरारी..

प्रतिनिधी (अजय विघे) येवला : जिद्द, शिकण्याची उमेद आणि अभ्यासाची तळमळ असली की यश नक्की मिळते. हे या ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनींनी दाखवून दिले आहे. वर्षभर कॉलेज करून रोज शेतीकामात आई-वडिलांना मदतीचा हात देतानाच कधी पायी तर कधी सायकलवर शाळेत येत विद्यार्थिनींनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे..
सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम.जी. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९२ टक्के लागला. अतिशय प्रतिकूलतेवर मात करत अभ्यासाची जबाबदारी निभावत पायल काटे व आरती काकड या दोघींनी ८०.३३ टक्के गुण मिळवून विद्यालयात पहिला क्रमांक पटकावला. प्रतिकूलतेवर मात करत मिळविलेल्या तिच्या उत्तुंग यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वर्षभर नांदूर येथून कधी सायकलवर तर कधी पायी शाळेत येऊन शिक्षणाची आवड जपणारी अश्विनी सोनवणे ७७.३३ टक्के मिळवून द्वितीय तर योगेश वाघ याने ७७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
धामोडा येथील अतिशय गरीब कुटुंबातील दीक्षा आसाराम कांबळे हिने ७६.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. विद्यालयाचे ४५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात ७ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तर १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रमोद पाटील, सहसचिव प्रवीण पाटील, युवा नेते संभाजीराजे पवार यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना प्राचार्य शरद ढोमसे, पर्यवेक्षक आर.जी. पैठणकर, जेष्ठ शिक्षक गजानन नागरे यांचे मार्गदर्शन लाभले.



