क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर हटवले जातात ही चिंतेची बाब – जयंतराव पाटील
प्रतिनिधी- मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे हटवले जातात ही चिंतेची बाब आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र सदनातील प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
कर्तृत्ववान महिलांचे पुतळे ठेवायचेच नाहीत, ही भूमिका ठेवून हा कार्यक्रम झाला. त्यामुळे या महिलांबाबत सरकारच्या मनात काय भूमिका आहे हे महाराष्ट्राला कळले, असा टोलाही त्यांनी लगावला.
महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दोन कर्तबगार महिला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बाजूला करण्यात आला आणि वीर सावरकरांचा पुतळा ठेवून कार्यक्रम करण्यात आला. सावरकरांचा कार्यक्रम करायला कुणाचा विरोध नाही परंतु त्याठिकाणी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे दिसता कामा नयेत एवढा द्वेष का? असा संतप्त सवालही जयंतराव पाटील यांनी केला.
पूढे ते बोलले या दोन कर्तबगार महिलांनी देशासमोर आदर्श ठेवला आहे. आज महिला शिकल्या याचे सर्व श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर पुण्यकर्म केले आहे. या दोघींचा पुतळा बाजूला ठेवणे याचा निषेध महाराष्ट्रातील जनता करेलच शिवाय देशातील जनताही करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.