
प्रतिनिधी अजय विघे
नाशिक मधील चांदवड तालुक्यातील एका दलित कुटुंबावर रात्रीच्या सुमारास हल्ला करून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचे संतापजनक प्रकरण समोर आले आहे.
फिर्यादी बापू दशरथ जगताप राहणार कानडगाव – पाणपोई फाटा, चांदवड हे आपल्या पत्नी व तीन मुलांसह राहत आहेत. रात्री नऊच्या सुमारास गावातील इसम नामे विनायक काभू करंडे, शंकर पारू बिडगर, बाळू बबन बिडगर, सुनील विजय कुशारे यांनी दारूच्या नशेत फिर्यादीच्या घरी जाऊन शिवीगाळ करून फिरर्यादिस आणि त्याच्या पत्नीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. पत्नीच्या कानावर धारदार शस्त्राने मारून तिला जखमी केले तसेच गाव सोडून जा अन्यथा जीवे मारण्याची धमकीही त्यांनी या कुटुंबास दिली. घाबरलेल्या जगताप कुटुंबाने संशयित आरोपींच्या ताब्यातून आपली सुटका करून घेत घराच्या दरवाजाला आतून कडी लावून घेतली. तरीही संशयित दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते. संशयितांची गावात दहशत असल्याने कोणीही मध्ये पडण्यास धजावत नव्हते. अखेर जगताप कुटुंबाने पोलिसांना फोन करताच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्वरित घटना स्थळी दाखल झाले त्यामुळे पुढील अनर्थ टळला . पोलिसांनी फिर्यादीच्या जखमी पत्नीला सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले, मात्र रक्तस्राव जास्त होत असल्याने पुढच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चांदवड पोलिसांनी गुन्हा दाखल करून चारही आरोपीवर कारवाई करत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या सर्व प्रकाराबाबत बापू जगताप यांनी अधिक माहिती दिली. पुढील तपास चांदवड पोलीस अधिकारी करत आहे…



