पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे..संतोष शिंदे

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्रसरकारकडे शिफारस करून त्यांचा शासकीय महापुरुषांच्या यादीत समावेश करणेबाबत रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांना मेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले. महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षणयात्री म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी “कमवा व शिका” ही योजना सुरू करून मोठे काम केले. ते महात्मा जोतीराव फुले यांनी सुरु केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते. भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत आज साडे ४ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. व रयत शिक्षण संस्था आज ही सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कर्मवीर (कृतींचा राजा) ही उपाधी देऊन सन्मानित केले आहे.
भारतरत्न हा भारत देशातील एक सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. भारतरत्न पुरस्कार अशा व्यक्तीला दिला जात होता ज्याने देशासाठी, मानवतेसाठी, समाजासाठी उच्चकोटीची तसेच भरगच्च कामगीरी केलेली आहे. पण आता हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला दिला जातो. १९५५ साली कायद्यात बदल करून मरणोपरान्त भारतरत्न देण्याची देखील सोय करण्यात आली.
भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी असलेल्या निकषानुसार शिक्षण क्षेत्रातील शिक्षणप्रसारक म्हणून धोंडो केशव कर्वे व महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे अगदी याच निकषानुसार कर्मवीर भाऊराव पाटील यांचे देखील शिक्षण क्षेत्रातील योगदान हे अद्वितीय आहे. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील हे देखील भारतरत्न पुरस्कारासाठी पात्र आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेळोवेळी आढावा घेऊन शासकीय राष्ट्रपुरुषांच्या यादीत थोर व्यक्तींचा समावेश केला जातो. कर्मवीर भाऊराव पाटील हे या महाराष्ट्राचे भूषण आहेत. या महाराष्ट्रामध्ये सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी, जातीभेद मिटवण्यासाठी, गरिबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचवण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे योगदान हे अतुलनीय आहे. भारत सरकारने १९५९ मध्ये पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन आणि १९८८ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित करून भाऊराव पाटील यांचा सन्मान केला. त्यामुळे त्यांचा समावेश शासकीय महापुरुषांच्या यादीत असणे हे ही अत्यंत महत्वाचे आहे.
अशा या थोर व्यक्तिमत्वाची १३६ वी जयंती दि. २२ सप्टेंबर २०२३ रोजी येत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा सन्मान करत व महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी केलेले अमूल्य असे योगदान विचारात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता भारत सरकार कडे शिफारस करावी तसेच त्यांना जयंतीनिम्मित कृतीशील अभिवादन करण्यासाठी त्यांच्या नावाचा यावर्षीच शासकीय महापुरुषांच्या यादीत समावेश करून शासकीय स्तरावर त्यांची जयंती साजरी करण्याचे आदेश द्यावेत.
सदर विषयाचे निवेदन रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या वतीने इमेलद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मा. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आले आहे. असे त्यांनी सांगीतले.




