आंदोलनआरोग्यपाणीबानीमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

वीर संभाजी नगरमध्ये पाणीटंचाई व रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात आंदोलनाचा इशारा..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २५ ऑगस्ट २०२६ मुलुंड पश्चिम येथील एलबीएस रोड परिसरातील वीर संभाजी नगरमध्ये गेल्या २९ जून २०२६ पासून मुंबई महानगरपालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिसरातील नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याने अनेक कुटुंबांना रात्री उशिरापर्यंत तसेच पहाटेपर्यंत जागून पाणी भरावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम असून, पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
यासोबतच वीर संभाजी नगरमधील रस्त्यांची अवस्था देखील अत्यंत खराब झाली असून, गेल्या सुमारे १४ वर्षांपासून रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती झालेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, डांबरीकरण व खड्डे बुजविण्याचे काम अद्यापही अपेक्षित पद्धतीने झालेले नाही.

यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होत असून, गणेशमूर्तींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरवस्था गंभीर ठरू शकते. मुंबईतील भोलेश्वर परिसरात २२ फूट उंच गणेशमूर्ती कोसळून दोन जणांचा मृत्यू व तीन जण जखमी झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळातील सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.

एलबीएस रोड हा भांडूप ते मुलुंड या भागाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावरही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. गणेशमूर्तींच्या आगमनाच्या वेळी खराब रस्त्यांमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने रस्ते दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या सर्व समस्यांबाबत शिवभक्त अमित आर्या यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या टी विभागाच्या सहाय्यक आयुक्त योगिता कोल्ले मॅडम यांची भेट घेऊन निवेदन साद केले. वीर संभाजी नगरमधील पाणीपुरवठा, पाण्याचा कमी दाब तसेच रस्त्यांची दुरवस्था या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

दि. ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत या समस्यांवर ठोस कार्यवाही झाली नाही, तर १ सप्टेंबर २०२६ रोजी एलबीएस रोड येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवभक्त अमित आर्या यांनी दिला आहे.

नागरिकांच्या मूलभूत पाणीपुरवठ्याचा प्रश्न आणि गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई महानगरपालिका प्रशासन या प्रश्नांवर काय भूमिका घेते, याकडे आता वीर संभाजी नगरमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button