सतीश काळे यांची प्रकृती खालावली; वाय.सी.एम. (YCM) रुग्णालयात उपचार सूरू..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १० सप्टेंबर २०२३ मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरू केलेल्या संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांची प्रकृती खालावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून अमरण उपोषण सुरू असल्याने त्यांना त्रास जाणवू लागला. उपचारासाठी त्यांना काल रात्री पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाय.सी.एम. (YCM) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. प्रकृती खालावल्याने उपोषण सोडण्याचा निर्णय हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आला.


या वेळी पोलीस प्रशासनाचे अधिकारी नाईकवाडे, जन आंदोलन चळवळीचे मार्गदर्शक मानव कांबळे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव शांततेच्या मार्गाने आंदोलन छेडत आहे. शासकीय स्तरावर पाठपुरावा करत आहे.
या आंदोलनाचाच एक भाग म्हणून आंतरवली येथे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडले आहे. त्या ठिकाणी राज्य सरकारच्या गृहखात्याच्या चुकीच्या धोरणामुळे मराठा बांधवांवर लाठीचार्ज केला. त्या निंदनीय घटनेविरोधात सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे. त्या लाठीचार्ज विरोधात तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी आमरण उपोषण सुरू केले. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तीन दिवसांपासून उपोषण सुरू होते.
दरम्यान शनिवारी दि. ०९ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १० वाजता काळे यांची तब्येत अचानक खालावली. डॉक्टरांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात भरती होण्याची सूचना केली. या ठिकाणी मराठा समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रकृती खालाविल्याने उपोषण सोडण्याबाबत सर्वांनी एक मताने निर्णय घेतला. त्यानंतर सतीश काळे यांना उपोषण सोडण्याबाबत विनंती करण्यात आली. समन्वय समितीमधील सदस्यांच्या विनंतीवरून काळे यांनी उपोषण सोडले.
या वेळी समन्वय समितीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, आपला एक-एक कार्यकर्ता समाजासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्या कोणत्याही कार्यकर्त्याला त्रास होईल असे कृत्य घडू नये. कार्यकर्ते व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आमरण उपोषणकर्ते सतीश काळे आमरण उपोषणकर्ते सतीश काळे यांची तब्येत खालावल्याने, पोलीस प्रशासनाचे अधिकारी नाईकवाडे साहेब, मानव कांबळे, यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले यावेळी
प्रकाश जाधव, कैलास कदम, मारुती भापकर, राजन नायर, सचिन चिखले, जीवन बोराडे, सागर तापकीर, नकुल भोईर, युवराज दाखले, गणेश सरकटे, केदरे सर, राजेंद्र पाटील, रवी सोळंके, भावेश काच्या, शाम पाटील उपस्थित होते. येत्या दोन दिवसात काळे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल, असे YCM चे CMO डॉक्टर मस्के यांनी सांगितले आहे.
या बाबत सतिश काळे म्हणाले की, ज्येष्ठांच्या सूचनेनूसार हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. भविष्यात विविध मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सातत्याने आंदोलन करणार आहे. मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे काळे म्हणाले.



