यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील गैर व्यवस्थापनामुळे झालेल्या मृत्यूबद्दल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा- मानव कांबळे

प्रातिनिधी पिंपरी चिंचवड दि. १० जून २०२६ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून संचलित करण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मध्ये शुक्रवार दि. ०५ जून २०२६ रोजी हॉस्पिटलच्या गैरवस्थापनामुळे व निष्काळजीपणामुळे एका ज्येष्ठ व्यक्तीचा ( दिवंगत रावसाहेब वामन खंडागळे निवृत्त कर्मचारी, पीसीएमसी ) मृत्यू झाल्याचा आमचा आरोप आहे. यांचा शुक्रवार दि. ०५ जून रोजी दुपारी १२ः ३० ते १२:४५ च्या दरम्यान फुगेवाडी ते दापोडी दरम्यान पुणे मुंबई महामार्गावर अपघात झाला ते स्वतः दुचाकीवरून येत असताना मागून येणाऱ्या एका चार चाकी कारने त्यांना धडक दिली, अपघात तळावरून त्यांना काही आसपासच्या लोकांनी वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले असता हॉस्पिटलमध्ये बॅटरी चार्ज नाही असे कारण सांगून खंडागळे यांचा एक्स-रे काढण्यास अर्ध्या तासापेक्षा अधिक विलंब लावण्यात आला, रुग्णाबरोबरच्या व्यक्तींनी अनेकदा विनंती करूनही तेथील महिला कर्मचारी त्यांच्याशी उद्धटपणे बोलत होत्या व त्यांना सहकार्य करत नव्हत्या हे अतिशय गंभीर आहे. बॅटरी आल्यानंतर एक्स-रे काढला आणि त्यानंतर सोनोग्राफी करण्याची गरज असते तिथेही या रुग्णाच्या पुढे आणखी दोन-तीन रुग्ण असल्यामुळे त्यांच्या सोनोग्राफीला उशीर झाला खरंतर इमर्जन्सी म्हणून तातडीची गरज पाहता या रुग्णाला प्राथमिकतेने सोनोग्राफीसाठी घेणे आवश्यक होते परंतु घटनेचे कुठलेही गांभीर्य नसलेले वायसीएमचे कर्मचारी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे वागले. दरम्यानच्या काळात रुग्णाच्या शरीरामध्ये कदाचित अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांची परिस्थिती गंभीर झाली आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचे हॉस्पिटलने जाहीर केले. हा सर्व प्रकार पाहता यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये किती बेजबाबदारपणे कामकाज चालते याची प्रचिती कोणीही घेऊ शकते. ज्या रुग्णालयामध्ये प्रतिदिन हजारापेक्षा अधिक रुग्ण येऊन उपचार घेत असतात त्या रुग्णालयामध्ये अशा प्रसंगी एकच एक्स-रे मशीन असते एकच सोनोग्राफी मशीन असते हे व्यवस्थापकीय दृष्ट्या अतिशय चुकीचे असून, तो एक प्रकारे गुन्हा आहे असे आम्ही समजतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आठ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असलेले अंदाजपत्रक जर वैद्यकीय उपकरणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देऊ शकत नसेल तर मग वायसीएम सारख्या हॉस्पिटलमध्ये शेकडो डॉक्टर्स, कर्मचारी आणि इतर लोक काम करतात त्यांना फक्त वेतन देण्यासाठी हे हॉस्पिटल चालविले जाते का? असा ही प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडल्याशिवाय राहत नाही. या संदर्भात वाय. सी. एम. चे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांच्याशी संवाद केल्यानंतर त्यांनी “या केस मध्ये रुग्णाचा एक्स-रे वेळेवर काढला होता, परंतु सोनोग्राफीला पुढे अगोदरचे लोक असल्यामुळे उशीर झाला, आणि त्यामुळे पेशंटला जी दुखापत होती ती गंभीर झाली आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले” असे त्यांनी स्वतःहून सांगितले.
वरील हकीकत पाहता महानगरपालिकेच्या एक निवृत्त कर्मचारी, ज्याने वायसीएम मध्येच सीनियर क्लार्क म्हणून काम केले होते, जो स्वतः ऍडमिट व्हायच्या अगोदर आपले ओळखपत्र दाखवून मी इथला कर्मचारी आहे, थोडी लवकर काळजी घ्या अशी विनंती करत असताना सुद्धा, त्याच्याकडे गांभीर्याने न पाहता परिस्थितीचे अवलोकन व्यवस्थित न करता पेशंट कडे दुर्लक्ष केले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, हे स्पष्टपणे दिसून येत आहे त्यामुळे या गैर कारभाराला किंवा गैरव्यवस्थेला जे जे जबाबदार कर्मचारी आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे, रुग्णालयाच्या अधिष्ठाता असलेल्या डॉक्टर राजेंद्र वाबळे यांना व्यवस्थापना मध्ये सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, आवश्यक असतील तेवढ्या पुरेशा प्रमाणामध्ये एक्स-रे मशीन किंवा सोनोग्राफी मशीन्स उपलब्ध करून द्याव्यात, कर्मचाऱ्यांना इमर्जन्सी मध्ये कुठल्या पेशंट्स कडे प्राधान्याने लक्ष द्यायला पाहिजे याबद्दलचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. वाय सी एम रुग्णालयाबाबतच्या सर्वसामान्य रुग्णांच्या व रुग्णांच्या नातेवाईकांच्या अनेक तक्रारी वारंवार येत असतात परंतु व्यवस्थापकीय पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवर त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही, असा सार्वत्रिक अनुभव आहे. यामध्ये सुधारणा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे हे निवेदन देण्यामागचा उद्देशच तो आहे. महानगरपालिका आर्थिक संकटात आहे, असे नगरसेवकांकडून वारंवार बोलले जाते. महापालिका कर्जबाजारी झाली आहे असेही समजते, तशी अडचण असेल तर आपण स्पष्टपणे आम्हाला उत्तर द्यावे, आम्ही जबाबदार सामाजिक कार्यकर्ते म्हणून शहरातील जनतेकडून वर्गणी जमा करून वायसीएम किंवा इतर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक असलेल्या मशिनरी उपलब्ध करून देण्याची मोहीम हाती घेऊ.
दिवंगत रावसाहेब खंडागळे यांचा मृत्यू वाय सी एम रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे, त्यामुळे त्यांच्या मृत्यूची जबाबदारी घेऊन महापालिकेने त्यांच्या कुटुंबास योग्य ती आर्थिक मदत करावी तसेच दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष- मानव कांबळे यांनी पालिका आयूक्त श्री. विजय सूर्यवंशी यांना निवेदनाद्वारे केली आहे.



