
प्रतिनिधी । दि. २६ जुलै । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या स्थितीवरुन नाराजी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लक्ष्य करत केंद्रात मराठी मंत्री असतानाही, महाराष्ट्राचं दुर्देव आहे अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. तसंच सर्व नेते निर्ढावलेले, निर्ल्लज असून यासाठी समाजच जबाबदार आहे असा संतापही राज ठाकरेंनी व्यक्त केला. काही केलं तर आपल्याला मतदान होणार असा विश्वास असल्याने असंच प्रशासन मिळणार असं त्यांनी सुनावलं आहे. जसा समाज असतो, तसंच सरकार मिळतं असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
राज ठाकरेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपासह युती करणार असल्याच्या चर्चा फेटाळल्या. “कोणी कोणाला भेटलं म्हणजे युती होत नाही. मी बाळासाहेबांच्या एका पुस्तक प्रकाशनाला गेलो तेव्हा तिथे शरद पवार होते, मग लगेच युती झाली का?,” अशी विचारणा राज ठाकरेंनी केली.
अमित ठाकरेंना अडवल्यानंतर समृद्धी टोलनाक्यावर तोडफोड करण्यात आली. यावरुन भाजपा टीका करत आहे. त्यावर बोलताना राज ठाकरेंनी सांगितलं की, “अमित महाराष्ट्रभर दौरा करत असून टोलनाके फोडत चालला असं नाही आहे. गाडीला फास्टटॅग असूनही त्याला थांबण्यात आलं होतं. तो मी टोल भरल्याचं सांगत असतानही फोनाफोनी झाली. समोरचा माणूस उद्धटपणे बोलल्याने ती आलेली प्रतिक्रिया आहे”. दरम्यान अमित ठाकरे आता राजकारणात येत आहेत म्हणून त्यांना लक्ष्य केलं जात आहे असं सूचक विधान राज ठाकरेंनी केलं.
पुढे ते म्हणाले, “भाजपाने हे बोलण्यापेक्षा निवडणुकीत टोलमुक्त महाराष्ट्र करु अशी घोषणा केली होती, त्याचं काय झालं सांगावं. म्हैसकर यांना नेहमी टोलचं काम मिळतं. तो कोणाचा ला़डका आहे. ही टोलची प्रकरणं काय आहेत. तसंच समृद्धी महामार्गावर तुम्ही रस्ता बनवताना दोन्ही बाजूंनी फेन्सिंग टाकलेलं नाही. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अपघातात 400 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. याची जबाबदारी भाजपा किंवा महाराष्ट्र सरकार घेणार का? फेन्सिंग न लावता तुम्ही सगळा महामार्ग लोकांसाठी सुरु केलात. तिथे कुत्रे, हरिणी, गाई रस्त्यावर येत आहेत. लोक स्पीडमध्ये जाणार आणि अपघातात मरणार मग ही सरकारची जबाबदारी नाही का? पूर्वकाळजी घेण्याआधी टोल बसवत आहात. म्हणजे लोकांच्या जगण्या, मरण्याची काही काळजी नाही”?
“रस्त्यांची स्थिती किती घाणेरडी आहे. लोकांना पाच-पाच सहा तास लागतात. नाशिकवरुन माझे मित्र आले, त्यांना सात तास लागले. सगळीकडे खड्डे पडलेत, रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी आहे. मग तुम्ही कसले टोल वसूल करत आहात, रोड टॅक्स कसला घेत आहात? याबद्दल सरकार, भाजपा काही बोलणार आहे का? पालकमंत्र्यांना हे प्रश्न विचारले पाहिजेत,” असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
“17 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरु आहे. केंद्रीय मंत्री मराठी आणि महाराष्ट्रातील असूनही राज्यातील रस्ते खराब आहेत हे दुर्दैव आहे,” अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
नितीन गडकरी नेहमी मोठमोठे आकडे सांगत असतात. मग इतक्या अभ्यासू नेत्याचं हे अपयश आहे का? असं विचारण्यात आलं असता राज ठाकरे म्हणाले की “हे त्यांचं महाराष्ट्रातील अपयश आहे. मुंबई गोवा रस्त्याला 17 वर्षं लागतात, हे मोठं अपयश आहे. अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग 14 महिन्यात बांधली गेली होती. रामायणात तर वनवासाच्या 12 वर्षांच्या संपूर्ण कालावधीत सेतू बांधला होता. आपल्या वांद्रे वरळी सी लिंकला 10 वर्षं लागली आहेत. बहुधा तेच पुढारलेले होते”.
“मला लोकांची भूमिका कळली पाहिजे. त्रास होऊनही त्यांनाच मतदान करायचं असेल तर आम्हाला काय करायचं आहे. सर्व नेते निर्ढावलेले आणि निर्लज्ज आहे. याचं कारण आपला समाज आहे. सगळ्या गोष्टी भोगून परत परत त्यांनाच मतदान करायचं यामुळे हे शेफारले आहेत. त्यामुळे आम्ही कसंही वागलो तरी मतदान मिळणार असा विश्वास असंच प्रशासन मिळणार आहे. आम्ही 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार म्हणणार आणि नंतर युतीत कऱणार. परत लोक त्यांनाच मतदान करणार. जसा समाज असतो, तसंच सरकार मिळतं,” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.