प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ नोव्हेंबर २०२३ ज्या संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाने जगण्याचा अधिकार दिला त्या संविधानाची शहरातील नागरिकांना ओळख व्हावी यासाठी २६ नोव्हेंबर रोजी ‘भारतीय संविधान दिवस’ साजरा करण्यात येणार असून त्या अनुषंगाने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांनी केले आहे.
संविधान दिवसाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने २६ व २७ नोव्हेंबर रोजी पिंपरी येथील “भिमसृष्टी” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील मैदानात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून त्यानंतर संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. तसेच सकाळी १०.४५ वाजता पिंपरी “भिमसृष्टी” येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
सकाळी ११ वाजता पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील मैदानात संविधान दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे उद्घाटन आयुक्त सिंह यांच्या हस्ते होणार असून स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी ११.१५ वाजता राजमाता जिजाऊ कलामंच यांचा भारतीय संविधानावर आधारित ‘’जागर संविधानाचा’’ हा लोकप्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.३० वाजता गझलगायक अशोक गायकवाड यांचा भारतीय संविधानावर आधारित गझलगायनाचा कार्यक्रम संपन्न होणार असून दुपारी २ वाजता ख्यातनाम कव्वाल मुज्तबा नाझा यांचा भारतीय संविधानावर आधारित कव्वालीचा कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ५ वाजता ‘’भारतीय संविधान आणि समाजकारण’’ या विषयावर महाचर्चेचे आयोजन करण्यात आले असून या चर्चेत डॉ. बालाजी जाधव, राहुल कोसंबी, प्रा.डॉ. लोकेश कांबळे, ऍड. गौरव काकडे सहभागी होणार आहेत. या महाचर्चेचे सूत्रसंचालन ऍड. सुधीर थिटे करणार आहेत. सायंकाळी ७ वाजता कलारंजन इव्हेंट्स ऍन्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत भारतीय संविधानावर आधारित संगीत, नृत्य, नाट्य व दृकश्राव्य माध्यमातून ‘‘गौरव संविधानाचा’’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.
२७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता गायक सुधाकर वारभुवन, मारूती जकाते, अनिरूद्ध सुर्यवंशी यांचा प्रबोधनपर गीत गायनाचा कार्यक्रम होणार असून ११.३० वाजता महिला बचत गट व दिव्यांगांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी समाजविकास विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी १२ वाजता अवयव प्रत्यारोपण अधिकृतता समितीचे सदस्य आपटे काका उर्फ श्रीकांत आपटे यांचे ‘’फिरून पुन्हा जन्मेन मी’’ या विषयावरील व्याख्यान होणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता प्रज्ञा इंगळे, विशाल ओव्हाळ, स्वप्नील पवार यांचा प्रबोधनपर गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दुपारी ३ वाजता ‘’आवाज संविधानाचा’’ या कविसंमेलनाचे आयोजन केले असून या संमेलनात प्रा. प्रशांत मोरे, डॉ. विनायक पवार, डॉ. स्वप्नील चौधरी, शमिभा पाटील, प्रवीणकुमार, रोहित शिंगे हे कवी सहभागी होणार आहे. सायंकाळी ५ वाजता मंजुषा शिंदे, संकल्प गोळे, धीरज वानखेडे यांचा प्रबोधनपर गीत गायनाचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध गायक मिलींद शिंदे यांच्या गीत गायनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.