प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०५ जानेवारी २०२४ गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई सांगवी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ६२३/२०२३ भा.दं.वि. कलम ४५४, ४५७,३८० पिंपरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ११२२/२०२३ भा.दं.वि. कलम ४५४,४५७,३८० मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साहेब यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडणारे घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले होते.
गुन्हे शाखा पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलीस आयुक्त श्री सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी अधिपत्याखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन सातत्याने घरफोडी चोरीचे गुन्हे घडणा-या पोलीस ठाणे हद्दीत गोपनिय बातमीदारांकरवी माहीती घेवून गुन्हेगारांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची सातत्याने तपासणी करुन व गुन्हेगारांच्या मोबाईलचा तांत्रीक तपास सुरु होता. दि. ०२/१२/२०२३ रोजी रात्री सांगवी पोलीस स्टेशन हद्दीमधील फिर्यादी सौ. स्मिता अमोल बोत्रे रा. श्री. हाईटस, जुनी सांगवी, पुणे यांचे राहते घरामध्ये अज्ञात चोरटयाने फ्लॅट मधील लोखंडी कपाट फोडून लॉकरमधील सुमारे २०.३५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १०,००० /- रुपये असा सुमारे आठ
लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला होता.
“गुन्हे शाखा युनिट २ कडून गुन्हयाचा समांतर करीत असतांना तांत्रीक तपासामध्ये व सीसीटीव्ही फुटेजवरुन सदरचा गुन्हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार जयवंत ऊर्फ जयडया गोवर्धन गायकवाड रा. आंबेगाव पुणे याने केल्याचे निष्पन्न झाले. वरीष्ठांचे आदेशाने घरफोडी चोरी गुन्हयाचा तपास सांगवी पोलीस स्टेशनकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करुन घेवून गुन्हयाचा सखोल तपास व संशयित आरोपीचा गुन्हे शाखा युनिट २ कडून शोध सुरु असतांना जयवंत उर्फ जयडया गोवर्धन गायकवाड हा पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे हद्दीत आला असल्याचे तांत्रीक तपासामध्ये निष्पन्न झाले.
दिनांक २८/१२/२०२३ रोजी रेकॉर्डवरील गुन्हेगार जयवंत उर्फ जयडया गायकवाड हा चिंचवड येथील स्मशानभुमी भागात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळालेने गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गणेश माने व स्टाफ यांच्या पथकाने चिंचवड स्मशानभुमी परिसरात सापळा लावुन थांबले असतांना रेकॉर्डवरील गुन्हेगार जयवंत उर्फ जयडया यास पोलीस असल्याची चाहूल लागल्याने तो पळुन जावु लागला त्याचा पोलीस स्टाफने त्याचा पाठलाग करुन अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपी जयवंत ऊर्फ जयडया गोवर्धन गायकवाड वय ३८ वर्ष रा. स्टार आहुरा सोसायटी आंबेगाव पुणे हा रेकॉर्डवरील सराईत घरफोडी चोरी करणारा चोरटा असुन त्याचेविरुध्द पिंपरी चिंचवड व पुणे आयुक्तालयाचे हद्दीमध्ये सुमारे ७० पेक्षा अधिक घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो इतर काही एक कामधंदा करीत नसुन घरफोडी चोरी करणे हेच त्याचे उपजिवीकेचे साधन आहे. जयवंत उर्फ जयडया हा आपण पोलीसांकडून पकडले जावु नये म्हणुन चोरी करणेसाठी इतर कोणीही साथीदार सोबत न घेता एकटा चोरी करीत असतो. प्रत्येकवेळी राहणेचे त्याचे ठिकाण बदलुन व वेशांतर करुन वावरत असतो. घरफोडी चोरी गुन्हयांचे अनुषंगाने त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने सांगवी व पिंपरी हद्दीत घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली तसेच चोरीतील सोन्याचे दागीने त्याची पत्नी विद्या जयवंत गायकवाड हिचे मदतीने सराफ व्यावसायिक गौरवकुमार शामसुंदर विजयवर्गीय रा. आंबेगाव पुणे याला विक्री केल्याची माहीती दिली.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये निष्पन्न आरोपी १) जयवंत ऊर्फ जयडया गोवर्धन गायकवाड वय ३८ रा. स्टार आहुरा सोसायटी आंबेगाव पुणे, चोरीचे सोन्याचे दागीने खरेदी घेणारा सराफ व्यावसायिक २) गौरवकुमार शामसुंदर विजयवर्गीय वय ३६ रा. आंबेगाव पुणे व सोन्याचे दागीने विक्री करणेसाठी मदत करणारी मुख्य आरोपीची पत्नी विद्या जयवंत ऊर्फ जयडया गोवर्धन गायकवाड रा. आंबेगाव पुणे हे आरोपी आहेत. अटक आरोपी जयवंत उर्फ जयडया याचेकडून सांगवी व पिंपरी पोलीस स्टेशन मध्ये दाखल ०२ घरफोडी चोरीचे गुन्हे
उघडकीस आले असुन सुमारे १३ लाख रुपये किंमतीचे २२ तोळयाचे सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले आहेत. गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. श्री. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सतिश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे – १ श्री बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार देवा राऊत, जयवंत राऊत, प्रमोद वेताळ, आतिष कुडके, उषा दळे, शिवाजी मुंढे, नामदेव कापसे, उध्दव खेडकर, अजित सानप, जमीर तांबोळी, दिलीप चौधरी यांनी केली आहे.