पोलिसमहाराष्ट्रविशेषशहर

पोलिस आयुक्तांच्या ‘त्या’ आदेशामुळे पोलिस खात्यात खळबळ!

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १० फेब्रूवारी २०२४ भ्रष्टाचार रोखण्यासाठी ठाण्यातील अधिकारी किंवा कर्मचारी यांना वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी कर्तव्य देऊ नये, असे स्पष्ट आदेश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार अधिकार्‍यांच्या कामामध्ये सहा महिन्यात तर कर्मचार्‍यांच्या कामात वर्षभरात बदल केला जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्ष एकाच ठिकाणी काम करणार्‍या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचेही चांगलेच धाबे दणाणले आहे.
पोलिस खात्यातील वाढता भ्रष्टाचार हा पिंपरी-चिंचवड सह राज्यातील चिंतेचा विषय बनला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात मागील वर्षभरात भ्रष्टाचारप्रकरणी 8 गुन्हे दाखल आहेत. यातील बहुतांश गुन्हे पोलिस खात्याशी संबंधित आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यातील एक महत्त्वाची उपाययोजना म्हणजे, आता यापुढे पोलिस ठाण्यातील अधिकारी सहा महिन्यांच्या पुढे एकाच ठिकाणी (बिटवर) काम करू शकणार नाहीत. तसेच, अंमलदारांचीदेखील एका वर्षाच्या पुढे ड्युटी बदलावी लागणार आहे. यापूर्वी पोलिस ठाण्यातील काही महत्त्वाच्या टेबलांसह तपास पथकांमध्ये ठराविक कर्मचारी वर्षानुवर्ष काम करत असल्याचे दिसून येत होते. या सर्व बाबींचा अभ्यास करून पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हा नवीन फंडा आजमावण्यास सुरुवात केली आहे.
“जबाबदारी प्रभारी अधिकार्‍यांचीच”
भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रभारी अधिकार्‍यांनी पोलिस ठाण्यात घडणार्‍या प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवावे, असे आदेश दिले आहेत. आपल्या हद्दीत कोणताही अनुचित प्रकार, बेकायदेशीर कामकाज होणार नाही, ही जबाबदारी प्रभारी अधिकारी यांचीच असल्याचे आदेशात नमूद आहे. आगामी काळात भ्रष्टाचाराचा प्रकार घडलेल्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांवर अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवून कारवाई करण्यात येणार आहे.
“सीसीटीव्ही फुटेजवर निगराणी”
पोलिस ठाणे किंवा गुन्हे शाखेच्या कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात
आले आहेत. संबंधित प्रभारी अधिकार्‍यांनी सीसीटीव्ही फुटेजवर निगराणी ठेवावी. तसेच, फुटेजमध्ये आढळणार्‍या आक्षेपार्ह बाबींबाबत तत्काळ कारवाई करावी, असे आयुक्तांनी म्हटले आहे.
“खासगी इसमांची नेमणूक बंद करा”
बहुतांश लाचप्रकरणांमध्ये पोलिस अधिकारी किंवा कर्मचार्‍यांसाठी खासगी इसम लाच मागत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोणतेही पोलिस अधिकारी किंवा कर्मचार्‍यांनी आपल्या हाताखाली खासगी इसमाची नेमणूक करू नये असे पोलिस आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे. तसेच, पोलिस ठाणे किंवा गुन्हे शाखेच्या कार्यालयात घुटमळणार्‍या खासगी इसमांची माहितीदेखील मागविली आहे.
“दर्शनी भागात लावावे फलक”
सर्व पोलिस ठाणे, शाखा, विभाग या ठिकाणी कामकाजाबाबतची सुस्पष्ट माहिती असलेले फलक लावावे. तसेच, कोणत्याही कामासाठी लाच किंवा प्रलोभन देणे अथवा स्वीकारणे, हा कायद्याने गुन्हा असल्याबाबतचे फलकही दर्शनी भागात लावण्याबाबत सूचित केले आहे.
“खात्यातील हिस्ट्रीशिटरवर वॉच”
पोलिस खात्यातील हिस्ट्रीशिटर म्हणजेच यापूर्वी ज्यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. तसेच, ज्यांच्यावर आरोप होत आहे, असे पोलिस अधिकारी आणि अंमलदारांवर प्रभारी अधिकार्‍यांनी ‘वॉच’ ठेवण्याच्या सूचना चौबे यांनी दिल्या आहेत. संबंधित अधिकार्‍यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्यास अधिकारी, अंमलदार यांचे कसुरी अहवाल पोलिस आयुक्त कार्यालयाकडून मागविण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस ठाण्यातील कोणते अधिकारी, कर्मचारी किती दिवसांपासून एकाच ठिकाणी काम करत आहेत, याची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. संपूर्ण माहिती संकलित झाल्यानंतर आदेशानुसार अंतर्गत फेरबदल करण्यात येतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!