चिंचवड येथील मनपाच्या शाळेतील १३ वर्षीय सार्थक कांबळेचा दुर्दैवी मृत्यू.
प्रतिनिधी अनिरूद्ध चव्हाण पिंपरी चिंचवड दि. १६ फेब्रुवारी २०२४ पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या चिंचवड येथील हुतात्मा चापेकर विद्यामंदिर या शाळेतील एका १३ वर्षीय विद्यार्थ्याचा जिन्यातील रेलिंगवरून पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दि. १६ रोजी सकाळी घडली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सार्थक कांबळे वय १३ वर्ष, रा. काळेवाडी पिंपरी असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सार्थक हा चिंचवड येथील हुतात्मा चापेकर शाळेत जिन्याच्या रेलिंगवर खेळत होता. शाळेच्या इमारतीमध्ये जिन्याच्या रेलिंगवरून तो घसरगुंडी खेळत असताना रेलिंगवरून त्याचा तोल गेला आणि तो जिन्याच्या डक्टमध्ये पडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झाल्याने सार्थकला तात्काळ पिंपरी येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे
डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनंतर पालकांचा शाळेत जमाव जमला होता. पोलिसांनी जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पूढील तपास पोलिस करत आहेत.