
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०७ डिसेंबर २०२३ कर्मचाऱ्याला नोटीस दिल्याच्या कारणावरून सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावण्यात आली. याप्रकरणी माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी दि. ०५ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी बाराच्या सुमारास ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात घडली.
याप्रकरणी राजेश नंदलाल भाट (५४, रा. थेरगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शंकर मुरलीधर सोनवणे (३२, रा. बोपखेल गावठाण), संतोष लांडगे (४५) आणि एक अनोळखी व्यक्ती (नाव व पत्ता माहिती नाही. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी राजेश भाट हे पालिकेच्या ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत आहेत. दरम्यान, त्यांनी शंकर सोनवणे यास विनापरवाना गैरहजर आणि उद्धट वर्तनाबाबत नोटीस बजावली होती. या कारणावरून त्याने साथीदारांसमवेत भाट यांना शिवीगाळ केली. तसेच, मारहाण करण्यासाठी अंगावर धावून आलेल्या अनोळखी आरोपीने भाट यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर भाट यांना मारहाण करत त्यांच्या कार्यालयात ओढून नेले. शंकर सोनवणे याने तुझ्या नावाने आत्महत्या करून तुझी नोकरी घालवतो, अशी धमकी दिली. फिर्यादी शासकीय काम करत असताना आरोपींनी अडथळा निर्माण केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.



