पिंपरी चिंचवड कर्मचारी संघाने कौतुकास्पद कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले.
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २६ फेब्रुवारी २०२४ प्रबोधनकार केशवराव ठाकरे क्रीडा संकुल यमुनानगर, निगडी येथे औद्योगिक क्रीडा संघटना आयोजित व्हॉलिबॉल (शूटिंग) स्पर्धा २०२४ संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघाने अंतिम सामन्यात फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स चाकण या संघास पराभूत करून अजिंक्यपद पटकावले.
पिंपरी चिंचवड कर्मचारी संघाने केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी संघाचे कौतुक केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संघाची एकतेची भावना या विजयामुळे दिसून येते. महापालिकेमध्ये सेवा बजावत असताना शूटिंग बॉल सारख्या खेळात चमकदार कामगिरी करणे ही महापालिकेसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघाच्या या यशाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नावलौकीकात भर घातली आहे. महापालिका सेवेत राहून शूटिंग बॉलसारख्या सांघिक खेळात कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन मिळविलेले यश हे इतर कर्मचाऱ्यांना नक्कीच प्रेरणा देणारे ठरेल, असे आयुक्त सिंह म्हणाले.
अंतिम सामन्यामध्ये फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स चाकण संघावर २-० अशी मात करत १५-५ आणि १५-६ या गुणांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघाने विजेतेपद पटकावले. या सामन्यात सुहास नाईक (कर्णधार), दशरथ वाघोले (उपकर्णधार), विजय गांगुर्डे, सोमनाथ वीर, अंकुश लोहकरे, प्रशांत उबाळे, वैभव विटकरे, सुनील लोंढे, सोमनाथ मोरे या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. यामध्ये तुकाराम गायकवाड यांनी संघाचे व्यवस्थापन केले तर क्रीडा विभागाचे उपआयुक्त मिनीनाथ दंडवते यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले.