प्रतिनिधी जुन्नर दि. २७ फेब्रूवारी २०२४ हजारो वर्षापासून काळाच्या ओघात आपले अस्तित्व शोधणार्या बुद्ध लेण्यांना न्याय देण्यासाठी भावी पिढी सज्ज झाली आहे. पण हे कार्य करत असताना येणाऱ्या अडचणी देखील तितक्याच कठीण आणि जीवावर बेतणाऱ्या आहेत. गेल्या सहा वर्षात ज्या प्रकारे महाराष्ट्रात बुद्ध लेण्यांच्या प्रचार – प्रसारासाठी जे काम होत आहे ते पाहता लेण्यांवर गर्दी वाढत आहे. पण ही गर्दी सातत्याने टिकण्यासाठी काही धोरणे हातात घेणे ही काळाची गरज आहे. या करिता बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती, पुणे द्वारा रविवार दि १८ फेब्रूवारी २०२४ रोजी तुळजा बुद्ध लेणी जुन्नर या ठिकाणी एक दिवसीय धम्म सहलीचे आयोजन करण्यात आले होते. कारण या सहलीत बुद्ध लेण्याचे संवर्धन का करावे हे विशेष मार्गदर्शन युवा पिढीच्या इतिहास प्रेमी आणि अभ्यासक यांच्या माध्यमातून होणार होते.
जुन्नर हे प्रांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सतराशे वर्षा पूर्वी पासून समृद्ध होते याचा मुख्य दाखला म्हणजे येथील किल्ले शिवनेरी आणि बुद्ध लेण्या होय. प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या मांडलीकांचा इतिहास समजून घेण्यासाठी मोठ्या उत्साहात सज्ज होऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्मारक भीमसृष्टी पिंपरी या ठिकाणाहून बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तब्बल १०० पेक्षा जास्त उपासक/उपासिका अतिशय आनंदात बुद्ध, भीम गीते गात जुन्नर येथील तुळजा बुद्ध लेणी कडे निघाली. पण कोणालाच माहित नव्हते कि आनंदाचा हिंदोळा सूमधूर गितांन ऐवजी किंचाळ्याने भरून जाईल असे कोणालाच वाटले नाही. कारण ही तसेच आहे या बुद्ध लेणीच्या आवारात अनेक वेळा मध-माशांचे हल्ले झाले होते त्यामुळे अनेक पर्यटकांना इजा झाली होती पून्हा तोच प्रकार होईल याची कल्पना कोणालाही नव्हती.
तुळजा बुद्ध लेणीच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर सर्व सदस्यांनी नाष्टा केला. गावातील काही लोकांनी परिसरातील मध माशा विषयी सर्वाना माहिती दिली होती. त्याच प्रकारे आयोजकांनी देखील अनेक सूचना सर्वाना दिल्या होत्या. लवकरच सर्वांनी लेणीच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली व लेणी मध्ये पोहोचल्यानंतर लेणी मध्ये स्वच्छता करण्यास सुरुवात केली. व नियोजित स्थळी पोहचून तेथिल प्राचिन स्तूपास पुष्प अर्पण करून बुद्धंम् सरणम् गच्छामि धम्मंम सरणम् गच्छामि संघंम सरणम गच्छामि असा जयघोष करत चैत्यगृहातील स्तूपास प्रदक्षिणा करण्यात आली. या नंतर बुद्ध लेणी मुक्ती आंदोलन समितीच्या सदस्य प्रियाताई शेख यांनी या धम्म सहलीस आलेल्या सर्वांचे स्वागत केले व बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समितीचे सदस्य समाधान सोनवणे यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली व बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती करत असलेले कार्य सर्व उपस्थित असणाऱ्या सदस्यांना समजावून सांगितले.
बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समितीचे सदस्य राजू भालेराव यांनी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनास सुरुवात केली व अध्यक्षस्थानी लेणी प्रेमी सुरेश वाघमारे यांची निवड केली अध्यक्षांच्या परवानगीने पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. या धम्म सहलीस आलेल्या १५० सदस्यांनी लेणीतील मुख्य चैत्यगृहामध्ये सुमधुर आवाजामध्ये सामुदायिक बुद्ध वंदना घेतली बुद्ध वंदना घेत असताना असे वाटत होते की आपण प्राचीन काळामध्ये आलो आहोत की काय व त्याकाळी या बुद्ध लेण्यांचे वैभव कसे असेल हा देखील अनुभव येत होता.
बुद्ध वंदने नंतर राजू भालेराव यांनी तुळजा या बुद्ध लेणीची माहिती सोप्या भाषेमध्ये सर्व उपस्थितांना समजावून सांगितली या नंतर लेणी प्रेमी इतिहास प्रेमी बोधिसत्व चॅनलचे सहकारी मनोज गजभार यांनी लेणी संवर्धन म्हणजे काय लेण्यांचे संवर्धन कशाप्रकारे करावे लागेल या विषयी मार्गदर्शन केले मुंबई येथील आलेल्या “एकजूट लेणी प्रचार प्रसार समूहाचे” लेणीप्रेमी सारीश डोळस यांनी या लेण्यांमध्ये अतिक्रमण कशाप्रकारे झाले याविषयी मार्गदर्शन केले
नंतर बोधिसत्व चॅनलचे संचालक इतिहास प्रेमी सागर कांबळे यांनी या प्राचीन लेण्यांचे निर्माणकार्य का करण्यात आले आणि हा आपला प्राचीन वारसा का जपला पाहिजे या विषयी मार्गदर्शन केले. अशा स्वरूपाची माहिती सर्व सदस्यांनी या पूर्वी कधीही ऐकली नव्हती अशी माहिती सागर कांबळेंनी उपस्थितांना सोप्या शब्दात सातवाहन असो किंवा सातवाहन ते बुद्ध लेणीचा उदय कसा झाला हे समजावून सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष लेणी प्रेमी सुरेश वाघमारे यांनी हा आपला प्राचीन वारसा का जपला पाहिजे या ठिकाणी सतत का आले पाहिजे या विषयी मार्गदर्शन केले.
यानंतर सागर कांबळे यांनी पहिल्या लेणी पासून सर्व लेण्यांची माहिती सांगण्यास सुरुवात केली व मनोज गजभार यांनीही पुढील लेण्यांची माहिती सांगितली. सर्व लेण्यांची माहिती सांगून झाल्यानंतर ग्रुप फोटो काढून सर्व परतीचा प्रवास करणार होते त्यातील ३० टक्के सदस्य लेणी पासून बस पर्यंत जाण्यासाठी निघाले होते व १० ते १५ सदस्य लेणी क्रमांक ८ व ९ या ठिकाणी फोटो काढत होते.
याच लेणी लगतच्या गाव परीसरात कोणाचा तरी विवाह असल्याकारणाने या ठिकाणी ३० ते ४० युवक ही लेणी पाहण्यासाठी आले होते. त्यातील काही सदस्यांनी मधमाशा पाणी पीत असताना या प्राचीन पाण्याच्या टाकीमध्ये या माशांना दगड मारले व लेणीमध्ये वरच्या दिशेला या मध माशांचे पोळ असल्यामुळे या दोन्ही ठिकाणातील माशा उठल्यामुळे प्रथम दगड मारणाऱ्या मुलांना माशांनी डंक मारण्यास सुरुवात केली ती मुले या ठिकाणाहून खालच्या दिशेने पळत सुटली वाटेमध्ये चालणाऱ्या सदस्यांना फोटो काढणाऱ्या सदस्यांना व बसलेल्या बांधवांना ही या माशांनी डंक मारण्यास सुरुवात केली.
माशांपासून बचाव करत असताना एक लहान मुलगा व त्याची बहीण १० ते १२ फूट खाली दरीत पडले. पण मनोज गजभार यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता त्या चिमुकल्यांस वाचवण्यासाठी धाव घेत त्यांना त्या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.
बुद्ध लेणी मुक्ती आंदोलन समितीचे सदस्य महायन मसुरे, राहुल कांबळे, राजू भालेराव, अशोक बडेकर, समाधान सोनवणे, अक्षय कांबळे, राम भंडारे, प्रियाताई शेख, रोहिणीताई लादे, सुजाताताई बनसोडे, जोत्सना मोरे, युवराज शिरसाट, प्रमोद गायकवाड, अखिलेश साळुंखे, विजय पडघन, राम शिंदे, हर्षद बडेकर, मंदाकिनीताई गायकवाड, साधनाताई मेश्राम, प्रज्ञाताई इंगळे यांनी मधमाशांनी डंक मारलेल्या सदस्यांना योग्य वेळी मदत करून सुखरूप लेणीच्या पायथ्यापर्यंत आणले.
ही अशी घटना झाल्यानंतर लगेचच बाबासाहेब जंगले भारतीय पुरातत्त्व विभाग संरक्षण, अधिक्षक जुन्नर उपमंडल जुन्नर, पुणे यांना हा झालेला प्रकार फोन द्वारे कळवला परंतु इतकी मोठी घटना होऊन ही भारतीय पुरतत्व विभागाचा एकही अधिकारी या ठिकाणी पाठवण्यात आला नाही.
लेणी प्रेमी रवि कांबळे यांनी हा घडलेला प्रकार जुन्नर येथील ग्रामीण शासकीय रुग्णालय यांना फोन द्वारे सांगितला व तुळजा बुद्ध लेणीच्या पायथ्याशी अवघ्या १० मिनिटांत ॲम्बुलेन्स दाखल झाल्या व ज्या सदस्यांना या मधमाशांनी डंक मारले आहेत त्यांना त्वरित दवाखान्यात नेऊन कोणतेही केस पेपर न काढताच त्वरित उपचार करण्यास सुरुवात केली या ठिकाणी ७० ते ८० सदस्यांना सुट्टीचा दिवस रविवार असताना देखील तिथले डॉक्टर नर्स यांनी त्वरित औषोपचार करून बरे केले.
फक्त चार सदस्यांना जास्त मध माशा चावल्यामुळे चेहऱ्यावर जास्त सूज आली होती त्यांच्यावरही योग्य उपचार करून डॉक्टरांनी त्यांनाही काही वेळातच बरे केले. जुन्नर ग्रामीण रुग्णालयातील या डॉक्टर्स आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्वरित लेणी जवळ ॲम्बुलन्स घेऊन आलेले ॲम्बुलेन्सच्या ड्रायव्हर यां सर्वांचे कौतुक करावे व आभार मानावे तितके कमीच आहेत कारण सुट्टीचा दिवस असताना देखील ग्रामीण रुग्णालयांमध्ये इतकी त्वरित व्यवस्था होणे म्हणजे कठीणच वाटते परंतु या सर्व डॉक्टर्स आणि त्यांच्या टीमने केलेले कार्य खूप कौतुकास्पद आहे. सरते शेवटी जुन्नर मधिल पत्रकारांनी धाव घेतली आणि सरकारी रुग्णालयात दाखल झाले.
सर्वांवर व्यवस्थित वेळेवर उपचार झाल्यानंतर सर्व सदस्य पुन्हा पिंपरी चिंचवडच्या दिशेने निघाले व सर्वांना सुखरूप आपापल्या घरी बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समितीच्या सदस्यांनी पोहोचवले हा अनुभव खूप वेगळा आहे या पूर्वीही जुन्नर मधील लेण्यांमध्ये देशी विदेशी पर्यटकांवर अशाच प्रकारे मधमाशांनी हल्ले केले होते. त्यावेळीही व आत्ताही जीवित हानी होण्यापासून बचाव झाला आहे.
परंतु येणाऱ्या काळामध्ये भारतीय पुरातत्व विभाग व वन विभाग आणि तेथील स्थानिक प्रशासन यांनी या झालेल्या घटनेची दखल घेऊन या पुढे जुन्नर येथे असा अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेऊन या ठिकाणी काम केले पाहिजे व यापुढे असा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही ही व्यवस्था केली पाहिजे. या करिता सदर समिती द्वारे संकल्प केला गेला. जर या पुढे पुरातत्व विभागाला चांगलाच धडा शिकवण्यात येईल त्या साठी सर्व काही पणाला लावले जाईल वेळ आली तर काही दिवसात बुद्ध लेण्या मुक्ती साठी आंदोलन देखील करण्यात येईल. त्याच रात्री १२:२७ वा. भारतीय पुरातत्त्व विभागास या झालेल्या प्रकारा विषयी लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षे विषयी मेल पाठवण्यात आला व या मेलची अवघ्या काही तासांमध्येच त्याच रात्री २:४४ वा. दखल घेऊन भारतीय पुरातत्व विभाग व लेणी संवर्धक मिळून यापुढे काम करतील व असे होणारे प्रकार कशा प्रकारे रोखता येतील या विषयी लेणी संवर्धकांना सोबत घेऊन काम केले जाईल. असे बाबासाहेब जंगले संरक्षक सहाय्यक भारतीय पुरातत्व विभाग जुन्नर उपमंडल जुन्नर जिल्हा पुणे यांनी मेल द्वारे ही माहिती दिली.
काही फेसबुक पुरते मर्यादित असणाऱ्या खोडकर स्वतःला लेणी संवर्धक म्हणणाऱ्यांनी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न देखील केला. जे आज पुरातत्व खात्याची हुजुरी करत स्वतला संवर्धक म्हणवून घेत आहेत.
जो प्रकार घडला हा स्वयं घोषित लेणी अभ्यासक, संवर्धक यांच्या पर्यंत पोहचला होता मात्र त्यांच्या अप्रामाणिक स्वभावामुळे त्यांनी आपले बांधव कसे आहेत याची साधी विचारणा देखील केली नाही. त्यामुळे सर्व उपासक/ उपासकांनी या चळवळीत सहभागी होत असताना मुखवटे घालून बसलेल्या अभ्यासक, लेणी संवर्धक, लेणी संवर्धनाच्या नावावर लोकांना मूर्ख बनवणाऱ्या पासून सावध राहिले पाहिजे. कारण ही चळवळ थांबता कामा नये जर आज आपल्या पिढीला योग्य इतिहास कळला तरच आपली पिढी योग्य इतिहास घडवेल.