प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०४ मार्च २०२४ चिंचवड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ६२/२०२४ भा.द.वि. कलम ३६५, ३४ प्रमाणे पिंपरी चिंचवड दिनांक २८/०२/२०२४ रोजी सकाळी ०७.०० वा. चे सुमारास धनेश्वर मंदीर चिंचवडगांव येथुन पायी चालत निघालेल्या एका इसमाला जबदस्तीने फरफटत नेवुन पांढ-या रंगाच्या चारचाकी गाडीत कोंबुन किडनॅपिंग केल्याची माहीती नियंत्रण कक्षाकडून मिळाली. तात्काळ गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी जितेंद्र कदम यांनी त्यांचे सहकारी अधिकारी व स्टाफसह घटनास्थळी दाखल होवून घटनेची सखोल माहीती घेतली असता, किडनॅप केलेली व्यक्ती हा मुळचा बीड जिल्हयातील अंबाजोगाईचा राहणारा तुकाराम साधु शिंपले वय ४० असुन तो गेले दोन वर्षापासुन धनेश्वर मंदीराचे शेजारी पत्र्याचे शेडमध्ये चिंचवडगांव येथे राहणेस आला असुन धनेश्वर मंदीराच्या गोशाळेतील गायी राखण्याचे काम करीत असतो. पत्नी जिजाबाई ही धनेश्वर मंदीराची साफसफाई करुन बेलपाने विक्री करीत असल्याने तुकाराम हा रोज पहाटे बेलाची पाने घेवून येवून गायी चारण्यासाठी जात होता. नेहमीप्रमाणे बेलाची पाने घेवून रस्त्याने पायी चालत येत असतांना दबा धरुन बसलेल्या अज्ञात इसमांनी त्याचेवर झडप घालुन फरफटत नेत पांढ-या रंगाच्या चारचाकी गाडीमध्ये कोंबले व गाडी सुसाट वेगाने घेवून गेल्याची माहीती मिळाली. घटनास्थळी शिवतिर्थ बिल्डींग समोर रोडवर एक सुती पिशवी व चप्पल मिळुन आली, चप्पलची बारकाईने पाहणी केली असता धनगर समाज व ठराविक
समाजाचे लोक वापरत असलेली चप्पल असल्याचे दिसुन आले. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यांची तपासणी केली असता त्यामध्ये संशयित आरोपी व अपहरण करणेसाठी वापरलेली चारचाकी वाहन दिसुन आले. गाडीचे नंबर प्लेटला चिखल लावणेत आला होता त्यामुळे गाडी मालकाची माहीती मिळुन आली नाही.
गाडी गेलेल्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करीत मागोवा घेतला असता गाडी बीड जिल्हयामध्ये गेल्याचे स्पष्ट झाले. गुन्हे शाखा पोलीस उप आयुक्त संदिप डोईफोडे व सहा. पोलीस आयुक्त सतिश माने यांना घटनेची सविस्तर माहीती कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस उप निरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार जयवंत राऊत, आतिष कुडके, संदेश देशमुख यांचे एक पथक तयार करुन सदर पथकाला सुचना व मार्गदर्शन करुन तात्काळ बीड जिल्हा येथे रवाना केले.
सदर तपास पथकाने आंबेजोगाई जिल्हा बीड पर्यंत आरोपींचा मागोवा घेवून गुन्हयाचा सखोल तपास करुन कसोशिने शोध घेतला. किडनॅप करण्यात आलेला इसम तुकाराम शिंपले हा चिंचवड येथे राहणेस येण्यापुर्वी आंबेजोगाई बीड येथे शेळया-मेंढया खरेदी – विक्रीचा व्यवसाय करीत होता. मध्यस्ती केलेल्या व्यवहारामधील खरेदीदार यांनी पैसे परत न दिल्यामुळे लोक वारंवार पैसे मागत असल्यामुळे शेती, दागीने विकुन काही लोकांची देणी देवून उपजिविकेच्या कामासाठी चिंचवड येथे येवून राहत असलेची माहीती मिळाली. काळयाचीवाडी ता. धारुर जि. बीड येथील ज्ञानेश्वर यादव रुपनर हा इसम चिंचवड येथे गेले आठ दिवसापुर्वी दोन ते तीन वेळा येवून गेल्याची गोपनिय माहीती मिळाली. त्या अनुषंगाने तपास पथकाने संशयित आरोपीचा शोध घेतला असता सदरचा भाग हा अत्यंत दुर्गम दळण – वळणाच्या सुविधा नसलेला व डोंगर – द-यांचा असल्याने अतिशय अडचणी येत होत्या, कोणत्याही प्रकारे निटनिटके मोबाईल नेटवर्क मिळत नव्हते.
तपास पथकाने वेशांतर करुन सलग दोन दिवस संशयिताचे घर परिसरात सापळा लावुन पाहणी केली असता ज्ञानेश्वर रुपनर याच्या हालचाली संशयित दिसुन आल्या म्हणुन ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर वय २२ वर्षे धंदा-मजुरी रा. काळयाची वाडी ता. धारुर जिल्हा बीड यास घेराव घालुन पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडे तुकाराम शिंपले याचे बाबत विचारपुस केली असता तो काही एक समाधानकारक माहीती देत नव्हता. त्याचे घर परिसराची बारकाईने तपासणी करुन शोध घेतला असता एका पत्र्याचे खोलीला कुलुप असल्याचे दिसुन आले. पत्र्याचे खोलीतुन कोणीतरी आतमध्ये असलेचा संशय आल्याने लागलीच कुलूप तोडून पाहणी केली असता अपहरीत इसम तुकाराम साधु शिंपले वय ४० हा मिळुन आला त्याची सुरक्षितरित्या सुटका केली.
सखोल तपासामध्ये असे निष्पन्न झाले कि, मेंढपाळ रघुनाथ नरुटे याच्या शेळया-मेंढी विक्री व्यवहारामध्ये तुकाराम शिंपले याने मध्यस्ती केली होती परंतू खरेदीदार याने साडेचौदा लाख रुपये न दिल्याने तो तुकाराम शिंपले याचेकडे वारंवार पैसे मागत होता. पैसे न दिल्याचे रागातुन रघुनाथ नरुटे याने त्याचा भाचा ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर व भाच्याचे मित्र संदीप विक्रम नकाते, हंसराज सोळुंके व नितिन जाधव यांना अर्टीका गाडी नंबर एम एच ०४ एफ झेड ९४१७ भाडयाने करुन देवून तुकाराम शिंपले याचे किडनॅप करणेची सुपारी दिली होती. अर्टीका गाडी नंबर एम एच ०४ एफ झेड ९४१७ सह आरोपी ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर वय २२ वर्षे धंदा- मजुरी रा. काळयाची वाडी ता. धारुर जिल्हा बीड यास चिंचवड पोलिस स्टेशनला गुन्हयाचेकामी हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, सपोफौ दिपक खरात, जयवंत राऊत, आतिष कुडके, संदेश देशमुख, देवा राऊत यांनी केली आहे.