महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

महाराष्ट्र इंटकच्या अध्यक्षपदी डॉ. कैलास कदम तर सरचिटणीस पदी गोविंदराव मोहिते यांची निवड!

प्रतिनिधी मुंबई दि.१९ मार्च २०२४ कामगार चळवळीतील मानाचे असलेल्या महाराष्ट्र इंटकच्या अध्यक्षपदी डॉ.कैलास कदम यांची तर सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांची आज रोजी संघटना कार्यालय मुंबई येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड झाली आहे.
महाराष्ट्र इंटकचे पूर्वीचे अध्यक्ष माजी आमदार कै. जयप्रकाश छाजेड यांच्या निधना‌‌नंतर‌ गेली दोन वर्षापासून सदर अध्यक्ष पदावर प्रभारी अध्यक्ष म्हणून डॉ. कैलास कदम हे कार्यरत होते. संघटनात्मक निवडणूक आज पर्यंत न झाल्याने संघटनेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याने राष्ट्रीय इंटकचे अध्यक्ष मा. खासदार डॉ.जी.संजीवा रेड्डी यांनी सदर बाबी करिता राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रप्रसाद सिंग यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नेमणूक केली. आज त्यांच्या उपस्थितीत मुंबई, फोर्ट येथील डॉ.सर जीवनजी मोदी सभागृहात निवडणूक घेण्यात आली. यावेळी ४४ कामगार संघटनांच्या १३३ सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. सदर निवडणूक बिनविरोध झाल्याने अध्यक्ष डॉ. कैलास कदम व सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांची एकमताने निवड झाल्याचे निवडणूक निरिक्षक चंद्रप्रसाद सिंग यांनी घोषित केले. यावेळी सभागृहातील सर्व मान्यवर, पदाधिकारी यासर्वांनी सदर निवडीचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. तसेच याप्रसंगी महाराष्ट्र इंटक नवीन कार्यकारिणी निवड करण्याचे‌ सर्व अधिकार अध्यक्ष व सरचिटणीस यांना देण्याचा ठराव मुकेश तिगोटे यांनी मांडला त्यास सभागृहात उपस्थित संलग्न संघटना प्रतिनिधीनी एकमताने मंजूर दिली.
नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.कैलास कदम हे हिंद कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार क्षेत्रात काम करत असतानाच मागील १९ वर्षे ते इंटक मध्ये कार्यरत आहेत. तसेच विविध कामगार संघटनेचे नेतृत्व करीत आहेत.
सरचिटणीस पदी निवड झालेले गोविंदराव मोहिते कामगार क्षेत्रात ३५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून कार्यरत आहेत. त्याच बरोबर ते इंटक चे ही काम करत आहेत.
केंद्र सरकारने कामगारांच्या विरोधातील “फोर कोड बिल” कायदा संमत करून कामगार व कामगार चळवळीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला आहे. त्या विरुद्ध कणखर पणे लढण्याचा निर्धार डॉ.कैलास कदम यांनी व्यक्त केला. त्याच बरोबर घरेलू,‌ आशा कामगार, अंगणवाडी, बांधकाम कामगार अशा अनेक असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटीत करित इंटक ची ही ताकद वाढविण्याचा निर्धार त्यांनी केला.
या निवडीचे संपूर्ण महाराष्ट्रातील‌ विविध कामगार संघटना व संलग्न संघटनाद्वारे स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!