
प्रतिनिधी रेणुका गायकवाड नाशिक दि. ०६ एप्रिल २०२४ आचारसंहितेच्या काळामध्ये ही नाशिक मध्ये अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट काही कमी झालेला दिसत नाहीये, नुकतेच नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या युनिट १ ने ४ एप्रिल २०२४ रोजी पेठ रोडला अवैद्य वाहतूक करून अवैद्य पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध केला जाणारा साडेअठरा लाखा पेक्षाही जास्त किमतीचा गुटखा कारवाई करून हस्तगत केला आहे. दिंडोरी – पेठ रोडकडून भक्तिधामच्या दिशेने येणाऱ्या ट्रकमध्ये या गुटख्याची अवैद्य वाहतूक होत होती. याप्रकरणी सदर वाहनाचे चालक आणि क्लिनरला अटक करण्यात आली आहे.
नाशिक क्राईम ब्रँच युनिट १ चे हवालदार प्रदीप म्हसदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दिंडोरी- पेठ रोडवरून क्रमांक: MH 12- MV 7510 या ट्रक मधून दोन व्यक्ती प्रतिबंधित असलेला गुटखा अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने पेठरोड कडून भक्तिधामकडे येणार आहे,
अशा मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने नाशिक क्राईम ब्रांच युनिट १ च्या पथकाने मोती सुपर मार्केट समोर, पेठरोड पंचवटी येथे सापळा लावला, त्यावेळी अशोक लेलॅण्ड कंपनीचा भगवा व सफेद रंगाचे पट्टे असलेला क्रमांक MH 12 MV 7510 हा ट्रक येतांना दिसला , सदर ट्रक रोखल्यानंतर ट्रकचालक आणि क्लिनर व ट्रकची पूर्ण तपासणी केली असता ट्रक मध्ये विक्रीकरीता आणलेला एकुण 18,57,120 रुपये किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू / गुटखा आढळून आला, संपूर्ण मुद्देमाल ट्रक सहित जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी अमोल ज्ञानोबा इंगुळकर वय-३७ वर्षे, धंदा-चालक, रा-मु.पो कामथडी ता. भोर जि.पुणे आणि जाबीर अफजल बागवान वय-३६ वर्षे, धंदा-क्लीनर, रा-घर नं ५९ बुधवार पेठ, बाराटक्के चौक शेजारी, सातारा यांना अटक करण्यात आली आहे.
गुटख्याचा संपूर्ण साठा तसेच ट्रकसह एकुण ३०,०७,१२० रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन, पोलिस हवालदार श्री. प्रदिप म्हसदे यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. पडोळकर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड, सहायक , पोलीस निरीक्षक श्री. हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. गजानन इंगळे, श्री. रवींद्र बागुल व यांच्या संपूर्ण टीम ने बजावली आहे.




