प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ९ मे २०२४ दिव्यांग बांधवांनी १०० टक्के मतदानाचा निर्धार करून दिव्यांग दुचाकी रॅलीद्वारे केलेल्या मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांचे अभिनंदन करून दिव्यांग बांधवांची प्रेरणा घेऊन शहरातील सर्व मतदारांनी देखील लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच घरकुल अपंग सहाय्य संस्था आणि अपंग सहाय्य संस्था यांच्या वतीने भक्ती शक्ती चौक, निगडी ते पिंपरी येथील मोरवाडी दिव्यांग भवन या परिसरात दिव्यांग बांधवांच्या भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह यांनी शहरवासियांना आवाहन केले.
चौकट-
“आम्ही दिव्यांग असलो तरी मतदानासाठी जागरूक आहोत आणि मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी करण्यात येणाऱ्या सोईसुविधांबाबत समाधानी आहोत. येत्या लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदानाचा आमचा निर्धार असून आम्ही शहरवासियांना तसेच देशातील सर्व मतदारांना आवाहन करतो की आम्ही दिव्यांग असूनही मतदानाचा हक्क बजावणार आहोत तसाच तुम्हीही मतदान करून हक्क बजवावा, असे आवाहन आज दिव्यांग दुचाकी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या बांधवांनी केले.
या कार्यक्रमाला उप आयुक्त अण्णा बोदडे, दिव्यांग संस्थांचे दत्तात्रय भोसले, संगिता जोशी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, श्रीनिवास दांगट, मुकेश कोळप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी विधानसभा कार्यालयाचे राजेंद्र कांगुडे, महालिंग मुळे, दिनेश जगताप, संदीप सोनवणे, चिंचवड विधानसभा कार्यालयाचे राजाराम सरगर, पल्लवी गायकी, ज्योती पाटील, दिपक येन्नावार तर भोसरी विधानसभा कार्यालयाचे अमोल फुंदे, संतोष धोत्रे, विनायक भुजबळ उपस्थित होते.
रॅलीच्या प्रारंभी उपस्थित दिव्यांग बांधवांनी ‘’लोकशाहीवर निष्ठा ठेवून, निवडणुकांचे पावित्र्य राखू आणि निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान कर’’ अशी शपथ घेऊन मतदान करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या सूचनेनुसार शहरात पथनाट्ये, रॅली, बलूनद्वारे अशा विविध प्रकारे मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
आयुक्त शेखर सिंह यांनी झेंडा दाखवल्यानंतर रॅलीत सहभाग घेणाऱ्यांनी ‘’नारी शक्तीचा सन्मान करू, सर्व महिला मतदार मतदान करू’’, ‘’मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’’, ‘’मतदानाचा टक्का वाढवू, देशाला सशक्त सरकार देऊ’’, ‘’मतदान माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी बजावणारच’’, अशा घोषणा देत, मतदान जनजागृतीचे संदेश फलक दाखवून रॅलीस प्रारंभ झाला.
मतदान जनजागृती मोटार रॅलीचा प्रारंभ भक्ती शक्ती येथून सुरु होऊन अप्पूघर कॉर्नर, मूकबधिर शाळा, हेडगेवार भवन, छत्रपती संभाजी चौक, बिजलीनगर पुल, चिंचवडे कॉर्नर, चिंचवड जुना जकात नाका, बिर्ला हॉस्पिटल, मोरया मंगल कार्यालय, ग क्षेत्रीय कार्यालय थेरगाव, तापकीर चौक, रहाटणी, पिंपळे सौदागर, महादेव मंदिर, नाशिक फाटा, भोसरी, लांडेवाडी, गवळी माथा, नेहरूनगर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दिव्यांग भवन मोरवाडी पिंपरी याठिकाणी रॅलीचा समारोप झाला. आज झालेल्या रॅलीत २०० हून अधिक दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णा बोदडे यांनी केले. सुत्रसंचालन व मतदान शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी तर आभार श्रीनिवास दांगट यांनी मानले.