आयुक्त शेखर सिंह यांनी सपत्नीक केले मतदान..
हरित मतदान केंद्रावर मतदान केलेल्या मतदारांना केले वृक्षरोपट्याचे वाटप…
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.१३ मे २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अजमेरा काॅलनी, पिंपरी येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी सपत्नीक मतदान केले.
हरित मतदान केंद्र
आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून शहरात महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने नागरिंकांमध्ये पर्यावरण संवर्धन विषयक संदेशाचा प्रचार व्हावा यासाठी चार हरित मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. उद्यान विभागाचे उप आयुक्त रविकिरण घोडके तसेच सहाय्यक उद्यान अधीक्षक राजेश वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी २४२ आयुर्वेदिक वनस्पतीं, नक्षत्र वाटिका आणि आयुर्वेदिक औषधी वृक्ष यांची माहिती देणारे फलक तसेच मतदान झाल्यानंतर पर्यावरणाचा संदेश प्रदर्शित करणारे आकर्षक सेल्फी पॉईंट लावण्यात आले आहेत.
आज आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते मतदान करणा-या मतदारांना वृक्षरोपांचे व बिजांचे वाटप करण्यात आले, यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, आण्णा बोदडे तसेच निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
उद्यान विभागाकडून उभारण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला , तर पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल स्कूल,या हरित मतदान केंद्रातही मतदान करणा-या मतदारांना वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले.