अपघातमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंगच्या सर्वेक्षणाला सुरुवात..

दोन दिवसीय सर्वेक्षणानंतर सोमवारपासून अनधिकृत होर्डिंगवर मनपा करणार कारवाई..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ मे २०२४ अनधिकृत होर्डिंग कोसळून होणाऱ्या अपघाताचा धोका कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरामध्ये सर्वंकष सर्वेक्षणास बुधवार, दिनांक १५ मे रोजीपासून सुरुवात करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आठ झोनमध्ये परवाना निरीक्षकांद्वारे शुक्रवार, दिनांक १७ मे रोजीपर्यंत दोन दिवसीय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वंकष सर्वेक्षणासाठी नोडल अधिकारी म्हणून संदीप खोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शुक्रवार, दिनांक १७ मे रोजी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली असून सर्वेक्षणाच्या निकर्षांवर विचार करण्यासाठी होर्डिंग मालकांना बैठकीसाठी बोलविण्यात आले आहे.

सर्वेक्षणामध्ये होर्डिंग्जचे कायदेशीर स्थितीचे मूल्यांकन, कोणत्याही प्रलंबित कायदेशीर कारवाईची छाननी, होर्डिंग मालकाचा तपशील तपासणी, होर्डिंगच्या स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्रांची पडताळणी, अनधिकृत होर्डिंगमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य रहदारी अडथळ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये होर्डिंगचे ठिकाण/पत्ता व त्याचे मंजूर व प्रत्यक्षात असलेले आकारमान तपासण्यात येणार आहे. त्याबरोबरच होर्डिंगची जमिनीपासूनची उंची, होर्डिंग अधिकृत आहे की अनधिकृत, होर्डिंगला पत्रा लावण्यात आला आहे की नाही, वाहतुकीस अडथळा देणारे होर्डिंग, कोर्टामध्ये दावा सुरू असलेले होर्डिंग व त्याची रचना पूर्ण आहे की अपूर्ण, ही माहिती ही सर्वेक्षणाच्या माध्यमातून तपासण्यात येणार आहे.

‘या’ बाबींचे होणार सर्वंकष सर्वेक्षण…

सर्वेक्षणाच्या महत्त्वाविषयी सह-आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले की, “ज्या होर्डिंगबाबत विभागाने सूचित केलेल्या बाबींची कमतरता असणाऱ्या होर्डिंगवर आम्ही सोमवार, दिनांक, २० मे रोजीपासून कारवाईची अंमलबजावणी करणार आहोत. त्यासोबतच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सर्वेक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीची पडताळणी करणार आहोत.”

दोन दिवसांत होर्डिंगधारक मालकांनी अनधिकृत होर्डिंग काढावेत…

“पिंपरी चिंचवड शहरातील होर्डिंगबाबतच्या संबंधित संभाव्य जोखीम ओळखून त्यांची दुरुस्ती करण्यासाठी सर्वंकष सर्वेक्षण महत्वाचे आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी होर्डिंगबाबतची माहिती संकलित करण्यासाठी सदर सर्वेक्षण करण्यात येत असून सर्वेक्षणास मालक व संबंधितानी सहकार्य करावे. त्याचबरोबर शहरातील अनधिकृत होर्डिंगधारक मालकांनी दोन दिवसामध्ये आपले अनधिकृत होर्डिंग काढून अपेक्षित उपाययोजना करण्याचे आम्ही आवाहन करतो आहोत.”

शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका..

चौकट : मागील वर्षभरात ‘१९१’ अनधिकृत होर्डिंग वर कारवाई…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने किवळे येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर मागील एक वर्षभरात १९१ अनधिकृत होर्डिंग निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!