महाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिक

महापालिकेच्या पहिल्या इंग्रजी माध्यमिक शाळेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

महापालिका शाळांमधील ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०४ ऑक्टोबर २०२४ आज आपण शिक्षणाच्या एका नवीन युगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत, जिथे ज्ञानाची सीमा नाही आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हे ज्ञान आत्मसात करण्याची संधी आहे. महापालिकेच्या वतीने फुगेवाडी येथे उभारण्यात आलेली ही माध्यमिक इंग्रजी शाळा केवळ एक इमारत नसून विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण आहे. महापालिका शाळांमध्ये एक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, येथील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आणखी बळ देण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली ही गुंतवणूक आहे. भविष्यात या शाळेतील विद्यार्थी नक्कीच शहराचे नाव राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर उंचावतील, असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने फुगेवाडी येथील लोकमान्य बाळगंगाधर टिळक विद्यामंदिर शाळेच्या नवीन इमारतीमध्ये ८ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा उभारण्यात आली आहे. या शाळेचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.
या उद्घाटन समारंभास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, उमेश ढाकणे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर,  मुख्याध्यापक राहुल अडवानी, आयटीच संस्थेच्या संचालक नेहा वैद्य, सिनियर गव्हरमेंट पार्टनरशिप असोसिएट गितेश शिनगारे, शंकर शिर्के, महेंद्र भोर, बजाज ग्रुप सीएसआर अध्यक्ष कुरूष इराणी तसेच आयटीच संस्थेचे प्रतिनिधी आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, महापालिकेच्या सध्या २ इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळा कार्यरत आहे. या शाळा शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येतात. माध्यमिक शाळांची तरतूद नसल्याने इयत्या नववी आणि दहावीच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना खाजगी शाळांचा पर्याय शोधावा लागतो. यामध्ये विद्यार्थ्यां-ची गळती होण्याची शक्यता फार असते. तसेच महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांच्या वातावरणात रुळायला व त्यांच्या शिक्षण पद्धती आत्मसात करण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांना येणाऱ्या या समस्या दूर करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सार्वजनिक – खाजगी भागीदारीतून ८ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी फुगेवाडी येथे माध्यमिक शाळा सुरू करण्यात आलेली आहे. 
चौकट –  महापालिका शाळेतील एकूण २३८ विद्यार्थी घेत आहेत इंग्रजी माध्यमिक शिक्षण
चिंचवड महापालिकेच्या लोकमान्य टिळक विद्यामंदिर, फुगेवाडी येथील शाळेच्या नवीन इमारतीमध्ये आयटीच (iTEACH) या संस्थेद्वारे इयत्ता ८ वी ते १० वी ची इंग्रजी माध्यमिक शाळा सुरु करण्यात आली आहे. शाळा चालविण्यासाठी आयटीच (iTEACH) संस्थेला महापालिकेच्या वतीने आवश्यक वर्ग खोल्या, भौतिक सुविधा तसेच वीज व पाणी पुरवठा अशा सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. फुगेवाडी येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या ही इंग्रजी शाळा चालविण्याची पूर्ण जबाबदारी आयटीच (iTEACH) संस्था घेणार आहे. त्यामध्ये शाळेचे रोजचे संचलन, शाळा मुख्यध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी निवड, शिक्षक प्रशिक्षण, शिक्षण पध्द्ती, प्रगती मूल्यमापन इत्यादी सर्व कार्य व यासाठी आवश्यक खर्च आयटीच संस्था देणगीदार संस्थांमार्फत करणार आहे. आयटीच संचलित शाळेमध्ये एस.एस.सी. अभ्यासक्रम शिकविला जाणार असून केवळ महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाच येथे प्रवेश घेता येणार असून एकूण २३८ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.
चौकट – शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये:
१) आयटीच (iTeach) संस्थेशी भागीदारी:
शाळेचे रोजचे संचलन, शाळा मुख्यध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी निवड, शिक्षक प्रशिक्षण, शिक्षण पध्द्ती, प्रगती मूल्यमापन इत्यादी सर्व कार्य व यासाठी महापालिकेने आयटीच संस्थेशी भागीदारी केली आहे.
२) महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या सुविधा :
महापालिकेने शाळेच्या कामकाजासाठी वर्गखोल्या, भौतिक सुविधा, वीज आणि पाणीपुरवठा यासारख्या आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
३) महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनाच प्रवेश :
केवळ महापालिका शाळांमधील विद्यार्थी या शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकतात. सध्या २३८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
४) अभ्यासक्रम:
शाळा राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार आयटीच संस्था भागीदार संस्थांकडून प्राप्त झालेल्या निधीतून शिक्षक प्रशिक्षण आणि मूल्यमापन यासह सर्व शैक्षणिक प्रक्रिया हाताळत आहे.
५) आयटीच (iTeach) संस्थेची भूमिका:
शाळेचे सुरळीत व्यवस्थापन तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करून दर्जेदार शिक्षक प्रशिक्षण आणि सुयोग्य शैक्षणिक पद्धती प्रदान करणे.
चौकट – ब्लेंडेड लर्निंग लॅब (BLL)
शाळेमध्ये BLL ब्लेंडेड लर्निंग लॅबची सुविधा आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेले शैक्षणिक अंतर भरून काढण्यासाठी या लॅबचा उपयोग केला जात आहे. शिक्षक मुलांना वर्गात एकाच पातळीचे शिक्षण देऊ शकतात. काही विद्यार्थ्यांना ते सोपे वाटू शकते किंवा काहींना ते अवघड वाटू शकते. यामुळे काही विद्यार्थ्यांचा सराव हा कमी पडतो. या लॅबच्या आधारे विविध ॲप व तंत्रज्ञांचा वापर केल्यामुळे विद्यार्थी त्यांना गरज असलेल्या शैक्षणिक पातळीवर शिकू शकतात. विद्यार्थ्यांची प्राथमिक भाषा इंग्रजी नसल्यामुळे किंवा त्यांच्या आस-पास इंग्रजी भाषेचा वापर अतिशय कमी असल्यामुळे त्यांची इंग्रजी भाषा विकसित होण्यास वेळ लागतो. एका शिक्षकाला ते साध्य करणे अवघड असते. लॅबच्या माध्यमातून तंत्रज्ञाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेमध्ये वाचन व ऐकण्याचे आकलन त्वरेने विकसित होण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!