प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि.१७ ऑक्टोबर २०२४ युवा पिढी देशाचे भवितव्य घडवत असते. समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे सामर्थ्य युवकांमध्ये आहे. आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये तरुण पिढी वास्तव्यास आहे.येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये युवकांनी स्वत: मतदान करावे तसेच आपले कुटुंब, मित्रपरिवार यांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन तरुणाईने आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन उपायुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी अण्णा बोदडे यांनी केले. ते युथ आयकॉन २०२४ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभामध्ये बोलत होते.
युवक-युवतींमधील कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी स्वीप उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि., एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल आणि रिलायन्स स्मार्ट बझार यांच्या वतीने युथ आयकॉन २०२४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युथ आयकॉन स्पर्धेमध्ये ४५० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला असून त्यांना २० हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी ऑनलाईन सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा पीसीएमसी स्मार्ट सारथी सिटीझन एंगेजमेंट उपक्रमाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, एल्प्रो सिटी इंटरनॅशनल लि.चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कुमार, एल्प्रो सिटी स्वेअरचे सेंटर डायरेक्टर निशांत कन्सल, रिलायन्स स्मार्ट बाजारचे स्टेट मार्केटींग हेड मनोज भडके उपस्थित होते. विशाखा शेरे, मनीष मिश्रा, प्रियांका बायांना यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमासाठी नामांकित कलाकार उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज चित्रपटामधील कलाकार स्वराज भोईटे, शीतल पाटील हे यावेळी उपस्थित होते. तसेच पियुष सजगने, ज्योती सेतसंधी, अक्षय पंडागळे यांनी देखील कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती नोंदवली.
युथ आयकॉन २०२४ स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता एल्प्रो सिटी मॉल, चिंचवड येथे आयोजित करण्यात आला होता. अत्यंत उत्साही वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध कलाप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनुष्का आणि सहकाऱ्यांनी गणेश वंदना सादर केली. त्यांनतर स्पर्धकांनी फॅशन शोमध्ये सादरीकरण केले. तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघाने कृष्ण वंदना सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. रणजित आणि संघाने ‘गोंधळ’ सादर केला. त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोमल आणि संघाने महिला सक्षमीकरण नृत्य सादर केले. त्यानंतर यशस्वी एड्युकेशन इन्स्टीट्युट आयआयएमएसच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. कार्यक्रमामध्ये ‘युवकांच्या नजरेतुन पिंपरी चिंचवड शहर काल, आज आणि उद्या’ या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आपले विचार ठामपणे मांडले.
यावेळी यशस्वी स्पर्धक आणि स्पर्धेसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. रील्स श्रेणीमध्ये उन्मेष कदम(प्रथम क्रमांक), श्रीकांत रहाणे(द्वितीय क्रमांक) शुभम वारंगुळे (तृतीय क्रमांक) यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. युथ आयकॉन विजेते(मुले) श्रेणीमध्ये अभय शिंदे(प्रथम क्रमांक), युवराज चव्हाण(द्वितीय क्रमांक), जीवन करंडे (तृतीय क्रमांक) यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. युथ आयकॉन विजेते(मुली) श्रेणीमध्ये अनुष्का मुकरे(प्रथम क्रमांक), सानिका चोरागी(द्वितीय क्रमांक), पूजा सनके(तृतीय क्रमांक) यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयाला सर्वांत जास्त विद्यार्थी सहभाग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभय शिंदे यांना पीपल्स चॉइस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल एल्प्रो सिटी स्क्वेअर आणि एनएफआयडी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच परीक्षक, कला सादरीकरण करणारे महाविद्यालय आणि विद्यार्थी संघांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी उपस्थितांना शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदान जनजागृती शपथ दिली. प्रभंजन नलावडे, संदीप कापसे आणि नुपूर हांडे,पौर्णिमा भोर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पी.सी.एम.सी. स्मार्ट सारथीचे आशिष चिकणे यांनी आभार व्यक्त केले.