शासकीय योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व उन्नतीस मिळतेय उभारी- जिल्हाधिकारी जलज शर्मा
प्रतिनिधी रेणुका गायकवाड – महाले नाशिक, दि. ०५ ऑक्टोबर २०२४ राज्य शासनाने महिलांच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिला अधिक सक्षम होवून सर्व क्षेत्रात उन्नती साधतील, असा विश्वास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केला. आज येथील ठक्कर डोम मैदान येथे जिल्हा
महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित जिल्हास्तरीय मार्गदर्शक महिला मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आमदार सीमा हिरे, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, महिला व बालविकास विभाग नाशिक विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे, जिल्हा समन्वयक संजय गायकवाड, एमएसआरएलएमचे विभागीय समन्वयक हेमंत पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी राकेश कोकणी, सचिन शिंदे, आरती गांगुर्डे, श्रीमती भोये, आकाश भोळे यांच्यासह अधिकारी व जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य व पोषणात सुधार करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ०१ जुलै २०२४ पासून कार्यान्वित केली आहे. या योजनेच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायती, अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, वार्डनिहाय कार्यालये यांच्या माध्यमातून जिल्हाभरात शिबिरे घेऊन महिला लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून यास चांगला प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १४ लाख ९३ हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १४ लाख ६८ हजार पात्र लाभार्थ्यांपैकी १४ लाख ६५ हजार लाभार्थांना बँक खात्यावर दोन महिन्यांचा लाभ देण्यात आला आहे. ९० टक्के महिलांना या योजनेचा तिसरा लाभही प्राप्त झाला आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी सलग्न झालेले नाहीत ते करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व बँकाना सूचना देण्यात आलेल्या आहेत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले.
राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, महिला सशक्तीकरणास चालना देणे आणि महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी राज्यातील गरजू महिलांना पिंक ई-रिक्षा शासनाकडून उपलब्ध होणार आहेत. नाशिक शहरासाठी ०१ हजार लाभार्थी संख्या मंजूर करण्यात आली असून जास्तीत जास्त महिलांनी महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातून अर्ज प्राप्त करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी उपस्थित महिलांना केले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. दुसाणे यावेळी म्हणाले की, सर्व जिल्हास्तरावर मार्गदर्शक मेळावे आयोजित करण्याच्या शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार आज येथे महिला मार्गदर्शक मेळावा अयोजित करण्यात आला आहे. शासनाच्या सर्व योजनांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात क्रांतिकारी योजना आहे. राज्यातील अडीच कोटी महिलांना याचा लाभ मिळाला आहेत. या प्राप्त लाभाचे महिलांनी नियमित गरजा पूर्ण करण्यासाठी नियोजन करावयाचे आहे. २० ते ४० वर्षे वयोगटातील महिलांसाठी शासनतर्फे पिंक रिक्षा उपलब्ध होणार आहेत. नाशिकसाठी ०१ हजार उद्दिष्ट यासाठी निश्चित करण्यात आले आहे. या योजनेचे अर्ज भरण्यासाठी व अनुषंगिक सुविधांसाठी महिला व बाल विकास कार्यालयाकडून महिलांना सहकार्य केले जाईल. महिलांना सुरक्षित प्रवासाची सुविधा याद्वारे उपलब्ध होणार आहे. कुटुंबातील एकल बालकांसाठी शिक्षण व पोषण बाल संगोपन योजनेद्वारे बालकाच्या खात्यावर ०२ हजार २५० अनुदान वर्ग करण्यात येते. बालकांच्या सुरक्षितेसाठी १०९८ हेप्लाईन क्रमांकाची सेवा सुरू करण्यात आली असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी १८१ ही हेप्ललाईन महिला व बाल विकास विभागामार्फत सुरू करण्यात आली असल्याची माहिती श्री. दुसाणे यांनी यावेळी दिली.
एमएसआरएलएमचे विभागीय समन्वयक हेमंत पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास जिल्हाभरातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी आयोजकांनी उपस्थित महिलांसाठी प्रश्नोत्तरे स्पर्धा घेतल्या व त्यातील विजयी महिलांना पैठणी देवून सन्मानित करण्यात करण्यात आले. खेळात जीव रंगला या मनोरंजनात्मक कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होवून गीतांवर ठेका धरला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी छाया दिलीप अहिरे, जिजाबाई चौधरी, सुवर्णा अंबेकर व ज्योती मगरे या बचत गट लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती चकोडिया यांनी केले.