देश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

मतमोजणी प्रक्रिया शांत, सौहार्दपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी सहकार्य करा – दीपक सिंगला

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ मे २०२४ मावळ लोकसभा निवडणूकीची मतमोजणी मंगळवार दि. ४ जून २०२४ रोजी सकाळी ८ पासून पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये पार पडणार आहे. ही मतमोजणी प्रक्रिया शांत, सौहार्दपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी नागरिकांनी निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी केले.
मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या ४ जून २०२४ रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवार तसेच त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी दीपक सिंगला बोलत होते.
यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे निवडणूक समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिंमत खराडे, निवडणूक समन्वयक अभिजित जगताप, निवडणूक सहाय्यक सचिन मस्के, मनिषा तेलभाते, माध्यम समन्वयक किरण गायकवाड, निवडणूक निरीक्षक समन्वयक प्रमोद ओंभासे, मनुष्यबळ कक्ष समन्वयक राजू ठाणगे आदी उपस्थित होते. 
येत्या ४ जून २०२४ रोजी बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये मतमोजणी पार पडणार आहे. निवडणूक  मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवण्यात आलेल्या सुरक्षा कक्षाचे सील मतमोजणीच्या दिवशी सकाळी ६.३० वाजता उमेदवार आणि त्यांचे निवडणूक प्रतिनिधी, निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत उघडण्यात येईल.
मतमोजणीसाठी लावण्यात आलेल्या टेबलची संख्या तसेच मतमोजणी फेऱ्यांची माहिती आणि मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती यावेळी सिंगला यांनी उपस्थितांना दिली.
असे नेमता येणार मतमोजणी प्रतिनिधी
निवडणूक मतमोजणी केंद्रावरील तयारी आणि संपुर्ण प्रक्रियेची माहिती दीपक सिंगला यांनी यावेळी दिली.  ते म्हणाले, प्रत्येक ईव्हीएम मतमोजणी टेबलला १ याप्रमाणे एकूण १०८ मतमोजणी प्रतिनिधी  तर टपाली मतमोजणी टेबलसाठी ५ प्रतिनिधी उमेदवारांना नियुक्त करता येतील. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या टेबलसाठी १ प्रतिनिधी नियुक्त करता येईल.
मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठी नियमावली
मतमोजणी प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने पुरविलेल्या ओळखपत्राद्वारे तसेच उमेदवाराने दिलेल्या नमुना १८ ची दुय्यम प्रत तपासून आणि घोषणापत्रावर सही घेऊनच मतमोजणी परिसरामध्ये प्रवेश दिला जाईल. उमेदवारांना मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश देताना त्यांची दोन स्तरावर तपासणी केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये नेमून दिलेल्या टेबल व्यतिरिक्त मतमोजणी प्रतिनिधींना इतरत्र फिरण्यास सक्त मनाई असेल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना याबाबत सूचना देणे अनिवार्य आहे. या अटी शर्तींच्या अधीन राहूनच उमेदवारांना तसेच त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींना मतमोजणी परिसरात प्रवेश दिला जाईल.
उमेदवारांसह मतमोजणी व निवडणूक प्रतिनिधींनी वैध ओळखपत्र परिधान करणे अनिवार्य
मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रीयेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. मतदान प्रतिनिधी एकदा मतमोजणी कक्षातून बाहेर गेल्यानंतर त्यास पुन्हा मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. भारत निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या ठिकाणी वागणूक वर्तणूकीच्या बाबतीत स्पष्ट निर्देश दिलेले असून शिस्तबद्ध वातावरणामध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या उमेदवाराने किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधीने किंवा मतमोजणी प्रतिनिधीने मतमोजणी परिसरामध्ये शिस्तीचा भंग केल्यास तात्काळ प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने भारतीय दंड संहिता लोकप्रतिनिधीत्व अधिनियम व तत्सम कायद्याप्रमाणे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे सिंगला यांनी यावेळी सांगितले.
मतमोजणी प्रतिनिधीचे ओळखपत्र दि. १ जून पुर्वी संबंधित उमेदवार अथवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून घ्यावे, अशी सूचना देखील सिंगला यांनी यावेळी दिली. मतमोजणीच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी निवडणूक प्रशासनास सहकार्य करून दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन देखील सिंगला यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!