श्रीमंतांच्या गाड्या विरुद्ध रिक्षाचालक: नियमांचा दुजाभाव? – के. अभिजीत
प्रतिनिधी पूणे दि. ३० मे २०२४ आपण रस्त्यांवर अनेकदा पाहतो की, श्रीमंत माणसांच्या गाड्या पासिंग नसतानाही तीन तीन महिने चालवल्या जातात. पुण्यातील अपघाताच्या घटनेनंतर हे उघड झाले आहे. नियम तोडले तरी पोलीस पैसे घेऊन अशा गाड्या सोडून देतात. रिक्षाचालकांच्या बाबतीत मात्र कडक नियम आहेत. रिक्षाचालकाने नियम तोडलाच तर गाडी जप्त करून कोर्टात जाऊन दंड भरून गाडी सोडवावी लागते. रिक्षा पासिंग नसेल तर दिवसाला वाढता दंड आणि रिक्षा जप्त होण्याची भीती असतेच. प्रशासनाच्या या दुटप्पी वागणुकीमुळे सर्वसामान्य रिक्षाचालकांना नेहमीच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
रिक्षा सार्वजनिक वाहतुकीत मोडत असल्यामुळे तिचे पासिंग नेहमी चालू असणे आवश्यक असते. हे बघण्यासाठी आरटीओ कडून रिक्षाचालकांवर नेहमीच कडक कारवाई केली जाते. रिक्षा पासिंग, वाढता दंड, त्यात विमा, सीएनजी पासिंग, मीटर पासिंग, रिक्षाची देखभाल, यामुळे रिक्षाचालकांवर जास्तीचा आर्थिक भार पडतो.
रिक्षाचालकांना अपघाताच्या बाबतीतही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अपघात घडल्यास, दंड आणि नुकसान भरपाईसाठी त्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होते.
दुसरीकडे, श्रीमंत माणसांच्या गाड्यांच्या बाबतीत नियमांची अंमलबजावणी तितकी कठोरपणे केली जात नाही. हे दुहेरी निकष शासनाच्या धोरणांची दुर्दशा दाखवतात. ही विषमता फक्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गाच्या विरोधात नसून, ती सामाजिक विषमता देखील दर्शवते.
सरकारने कधीच रिक्षाचालकांच्या समस्यांकडे गंभीरतेने पाहिले नाही. रिक्षा ही अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेची, उत्पन्नाची आणि नियमांचे पालन करताना येणाऱ्या अडचणींची काळजी घेतली जात नाही. शासनाने रिक्षाचालकांच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
रिक्षाचालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनाने आणि प्रशासनाने अधिक जबाबदारीने वागायला पाहिजे. त्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी धोरणांमध्ये आवश्यक बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्या बाबतीत समान न्याय असावा, शासनाचे धोरण असे असायला हवे.
शासनाने रिक्षाचालकांच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्यांना योग्य ती मदत पुरवावी, जेणेकरून त्यांचे जीवन सुकर होईल आणि त्यांच्या कष्टांचे योग्य मूल्यमापन होईल.
माझा अनुभव:
मी स्वतः शिक्षण घेत ८-९ वर्षे रिक्षा चालवली आहे, त्यामुळे या समस्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. अपघात, आरटीओचे नियम आणि त्यांचे उल्लंघन झाल्यास होणारे परिणाम, हे सर्व काही मी अनुभवले आहे. या सर्व अडचणींना तोंड देताना कधीकधी खूप अवघड होते. आजही रिक्षा हा माझ्या कुटुंबाचा आर्थिक उपन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे.
असे अनहद सोशल फाऊंडेशन | राईट टू लव्हचे अध्यक्ष के. अभिजीत यांनी यावेळी बोलले.