प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ८ जून २०२४ पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जात असली तरी या नगरीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाही आहे. संस्कृती आणि कलेची हीच आवड लोकांमध्ये निर्माण करण्याचे तसेच पिंपरी चिंचवडची सांस्कृतिक ओळख जपण्याचे काम महापालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी अकादमीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून केले जात आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.
नाट्यगीत, अभंग, शास्त्रीय गायन, सतार-व्हायोलिन जुगलबंदी, सहगायन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेल्या ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सव २०२४’ चे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
महापालिकेच्या ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी’च्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहामध्ये तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील नागरिक आणि रसिकांच्या उपस्थितीत या महोत्सवाची सुरूवात करण्यात आली. तसेच विदुषी डॉ. अश्विनी भिडे देशपांडे, पंडित डॉ. नंदकिशोर कपोते, स्वराधिश डॉ. भरत बलवल्ली यांच्या विशेष उपस्थितीत महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, समन्वयक समीर सुर्यवंशी, संगीत शिक्षक उमेश पुरोहित, क्रिडा पर्यवेक्षक अरूण कडूस निवेदक मंगेश वाघमारे आदी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले, सर्वांगीण आयुष्य जगण्यासाठी भौतिक सुविधांसोबत क्रीडा तसेच संगीत या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या आहेत. जवळपास २३ वर्षांपूर्वी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीची स्थापना झाली आणि उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड नगरीच्या सांस्कृतिक वारसात भर पडली. पिंपरी चिंचवड शहराचा सांस्कृतिक वारसा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात येत असते.
दरवर्षी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी अकादमीच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आतापर्यंत आपल्या कलेचे प्रदर्शन केले आहे. या कार्यक्रमांद्वारे रसिक प्रेक्षकांना प्रत्यक्ष शास्त्रीय संगीताची मेजवाणी अनुभवायला मिळते. गेल्या अनेक वर्षापासून बरेचसे दिग्गज कलाकार या ठिकाणी आलेले आहेत ज्यांनी त्यांची कला सादर केलेली आहे. येत्या तीन दिवसाच्या या पर्वामध्ये विविध गायन, नृत्य, शास्त्रीय संगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांनी दिली. तसेच या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी पुरेपूर लाभ घ्यावा आणि कलेची जोपासना करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा जो उत्सव आहे त्याला दाद द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचा प्रारंभ शास्त्रीय नृत्याद्वारे ‘गणेश वंदना’ ने करण्यात आला. त्यानंतर स्वराधिश डॉ. भरत बलवल्ली यांनी ‘दुर्गा’ रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली. त्यांनी गायलेल्या ‘खंबावती’ या रागाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकले. त्यानंतर ‘दिव्य स्वातंत्र्य रवी’ या त्यांच्या नाट्यगीताने प्रेक्षकांची वाहवा मिळविली. शेवटी ‘सुखाचे हे सुख’ आणि ‘हरी म्हणा’ हे दोन अभंग त्यांनी गायले ज्याने रसिक भारावून गेले. डॉ. भरत बलवल्ली यांना प्रसाद करवेंळकर, प्रशांत पांडव, सखाराम परब, पंडित भरत कामत, संतोष साळवे, पंडित समीर सुर्यवंशी, आशय कुलकर्णी, प्राणशु चतुरलाल, विष्णु कुलकर्णी यांनी तबला तसेच पखावज या वाद्यांनी साथसंगत दिली.
संध्याकाळच्या सत्रात विदुषी डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांना पंडित मकरंद कुदळे, मिलींद कुलकर्णी, पंडित सुयोग कुडळकर, उमेश पुरोहित, निरंजन लेले, अभिषेक शिनकर, धवल जोशी, जयवर्धन धाधिच, दिविज टकले, अझरूद्दीन शेख यांनी हार्मोनियम आणि बासरी या वाद्यांच्या सहाय्याने साथसंगत दिली.
उपस्थितांचे आभार विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले.