क्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

सुरज मुंढे यांच्या सायकलिंग क्षेत्रातील उत्तुंग भरारीमुळे पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकीकात भर – अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ जून २०२४ पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असली तरी क्रिडा, सांस्कृतिक, तंत्रज्ञान यांसारख्या विविध उपक्रमांतूनही शहराची वेगळी ओळख निर्माण होताना दिसून येते असे सांगून सुरज मुंढे यांच्या सायकलिंग क्षेत्रातील उत्तुंग भरारीमुळे पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकीकात भर पडली आहे तसेच त्यांच्यासारख्या अष्टपैलू खेळाडूचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.
भारतातील सर्वात खडतर मानली जाणारी दर ४ वर्षांनी होणारी गेट्स ऑफ हेवन या १ हजार २०० किलोमीटर सायकल स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी सुरज मुंढे या सायकलपटूने स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. काल त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांची भेट घेतली यावेळी त्यांचा अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी क्रिडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, स्वीय सहाय्यक शिवाजी टिळे आदी उपस्थित होते. सूरज मुंढे यांनी उपस्थितांना त्यांचा परिचय दिला. ते थेरगाव येथील रहिवासी असून घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी क्षेत्रात कार्यरत असलेले पर्यावरणवादी म्हणून त्यांची ओळख आहे. कोरोनाच्या काळात पिंपरी चिंचवडपासून सुरु झालेला सायकलिंगचा प्रवास अल्पशा कालावधीत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायकलिंग इव्हेंटस पूर्ण करत करत साता समुद्रापार पोहचला. फेब्रुवारी २०२२ ते जानेवारी २०२४ हा दोन वर्षाचा सायकलिंगचा प्रवास खूपच मनोरंजक व आव्हानात्मक होता, ज्यामध्ये सुपर रँन्डुनर सिरीज, टीम ऑफ थ्री डेक्कन क्लीफहँगर (पुणे ते गोवा रेस) पोडीएम फिनिशर, अर्कॅड सह्याद्री क्लासिक चार (पसरणी, भिलार, मेढा, व अंबेनळी) घाटांची स्पर्धा, बी.आर.एम. १०००, पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस २०२३, व गेट्स ऑफ हेव्हन २०२४ इत्यादी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायकलिंग इव्हेंट्स प्रथम प्रयत्नांत यशश्वीरित्या पूर्ण केले असल्याचे सुरज मुंढे यांनी सांगितले.
सुरज मुंढे यांना एप्रिल २०२४ मध्ये मॉडेक्स क्लब पॅरिस तर्फे आर ५००० हा मानाचा पुरस्कार देखील देण्यात आला आहे. पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस (पी.बी.पी.) २०२३ हा जागतिक दर्जाचा एक नामांकित व खडतर मानला जाणारा १२०० किलोमीटरचा सायकल ईव्हेंट जो प्रत्येक ४ वर्षातून एकदा होतो. या स्पर्धेमध्ये जगभरातून सुमारे ८ हजार स्पर्धक भाग घेतात या स्पर्धेदरम्यान डोंगरदऱ्या, घाट, सतत चढ उतार, विषम हवामान, थंडी, ऊन, वारा, पाऊस, आहार व झोपेवर नियंत्रण इत्यादी विविध आव्हानांना सामोरे जात सुरज यांनी हा १ हजार २१९ किलोमीटरचा इव्हेंट प्रथम प्रयत्नात ९० तासांत यशस्वीरित्या पुर्ण करत आपले आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू होण्याचे स्वप्न त्यांनी पुर्ण केले.
नुकताच देशात अतिशय खडतर मानला जाणारा जिओएच (गेट्स ऑफ हेवन) २०२४ हा सायकलिंग इव्हेंट देखील प्रथम प्रयत्नात यशस्वीरित्या पूर्ण करत पिंपरी-चिंचवड शहराचे नाव उंचावले आहे. या इव्हेंट दरम्यान दक्षिण भारतातील खडतर मानले जाणारे प्रामुख्याने येरकाड, कुन्नूर, दोडाबेट्टा-ऊटी, कलपेट्टा, ईरिट्टी, सकलेशपुर व चिकमंगलूरु असे विविध १४० किलोमीटरचे घाट त्यांनी सर केले. या ईव्हेंटचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास ५० टक्के मार्ग हा घनदाट जंगलातून, पश्चिम घाटातील दऱ्या खोऱ्यांच्या भव्य रांगा, निसर्गरम्य वातावरणात एकूण १४ हजार मीटरचे ईलेव्हेशन पार केले. सुरज यांनी हा १२०० किलोमीटरचा खडतर प्रवास प्रथम प्रयत्नांत ८९ तास व ४५ मिनिटांत यशस्वीपणे पुर्ण करत पिंपरी चिंचवड येथून पहिला जिओएच फिनिशर होण्याचा मान त्यांनी मिळवला.
सुरज मुंढे यांनी घेतलेले प्रशिक्षण, त्याचे ट्रेनर आशिष जोशींचा त्याचावरचा असलेला आत्मविश्वास, पत्नी आणि कुटुंबाने त्याच्यासाठी घेतलेले कष्ट, स्वतःची मेहनत, इच्छाशक्ती, आत्मविश्वास यांच्या जोरावर विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायकलिंग इव्हेंट्स प्रथम प्रयत्नांत यशश्वीरित्या पूर्ण केले आहे असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!