प्रेम म्हणजे अहिंसा, सहनशीलता, आणि परस्पर आदर – के. अभिजीत. राईट टू लव्ह..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २० जून २०२४ मुंबई वसईमध्ये घडलेली दुर्दैवी घटना ही केवळ धक्कादायकच नाही तर मानवी समाजाच्या संवेदनशीलतेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करते. आपल्या प्रिय व्यक्तीवर हिंसक हल्ला करणे हे कुठल्याही प्रकारे योग्य नाही. प्रेमाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला समर्थन देणे अनैतिक आणि अमानवीय आहे. प्रेम हे केवळ विश्वास, आदर, आणि आनंदावर आधारित असायला पाहिजे… ते कधीच हिंसाचाराचे कारण होऊ शकत नाही.
या घटनेसंदर्भात समाजातील लोकांची उदासीनता ही अधिकच चिंताजनक आहे. किमान १०-१५ लोकांनी ही घटना जवळून बघितली पण त्या मुलीला वाचवायला कोणी धाडस केलं नाही. याचा अर्थ असा आहे की आपल्यामध्ये सामाजिक जबाबदारी आणि सहकार्याची भावना कमी झाली आहे.
आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, तिच्या आनंदासाठी काम करणे किंवा वागणे ही प्रेमाची खरी भावना आहे. मग ती व्यक्ती आपल्यासोबत असो वा नसो, तिच्या सुखाचा विचार करणे यातच प्रेमाचे खरे महत्त्व आहे. कुणाचा जीव घेऊन काय साध्य होणार? एका व्यक्तीचा जीव घेणे म्हणजे फक्त त्याच्यावर नाही, तर त्याच्या कुटुंबावर, मित्रांवर आणि समाजावर देखील एक अमानवीय अन्याय आहे.
या घटनांमुळे आपल्याला आपली समाजातील जबाबदारी लक्षात घेणे गरजेचे आहे. प्रेमाच्या नावाखाली हिंसा रोखण्यासाठी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येकाने आपल्या भोवतालच्या लोकांबद्दल संवेदनशील आणि जागरूक असले पाहिजे. तसेच, आपण अशा परिस्थितीत मदतीसाठी धावून जाणे हे आपले कर्तव्य आहे.
प्रेमाचा खरा अर्थ समजून घेणे आणि त्याचे पालन करणे हे आपल्याला शिकवले पाहिजे. प्रेम म्हणजे अहिंसा, सहनशीलता, आणि परस्पर आदर. ‘राईट टू लव्ह’ हा फक्त अधिकार नाही, तर जबाबदारी देखील आहे. आपल्या वर्तनातून आणि कृतीतून या जबाबदारीचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. असे राईट टू लव्ह / अनहद सोशल फाऊंडेशनचे के. अभिजीत यांनी यावेळी सांगीतले.