चिंचवड विधानसभेतील सर्वसामान्यांच्या मुलामुलींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मोफत देणार-राहुल कलाटे
प्रतिनिधी चिंचवड विधानसभा दि. ०९ नोव्हेंबर २०२४ गोरगरिबांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून महापालिकेची एक सीबीएसई बोर्डची अद्यावत शाळा माझ्या संकल्पनेतून वाकडला उभी राहिली आहे. त्याच धर्तीवर विधानसभा क्षेत्रात विविध ठीकाणी शैक्षणिक संकुलं उभारुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोफत शिक्षण देण्याची माझी योजना आहे. असे प्रतिपादन महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी केले.
पुनावळेतील नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. देशाची भावी उज्वल पिढी सक्षम घडावी, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, रोजगाराभिमुख शिक्षणातून प्रत्येक मुलाला जगविख्यात आयटी पार्कमध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, असे धोरण आवश्यक आहे. साहित्य, कला, क्रीडा या विषयाचे सत्ताधारी नेत्यांना वावडे होते, असे दिसते. पालिकेच्या शैक्षणिक आरक्षित जागेचा वापर करून पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, रहाटणी-काळेवाडी, थेरगाव, रावेत-पुनावळे अशा सर्व ठिकाणी दर्जेदार शाळा उभारण्याचा माझा प्रयत्न राहील.
मी स्वतः शिक्षण संस्था चालक असल्याने शिक्षण समस्यांची जाण मला आहे. या सर्व समस्या लवकरात लवकर निकालात काढण्याचा माझा प्रयत्न राहील. सामान्य घरातील विद्यार्थ्याना बदलत्या काळानुसार आवश्यक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे. पारंपरीक आयटीआय शिवाय एआय म्हणजेच कृत्रिम बुध्दीमता आणि डेटा सायन्सशी संबंधीत कोर्सेस नाममात्र शुल्कात कसे उपलब्ध होतील यासाठी आराखडा तयार करतो आहे. राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने स्वतंत्र संकुल उभारणीचाही विचार आहे.
प्रतिक्रिया..
मी इथला भूमिपुत्र माझे मित्र आयटीमध्ये नोकरी करतात, सर्वांशी नियमित संवाद असतो, त्यांना काळजी आहे मुलांच्या शिक्षणाची, स्वतःच्या आरोग्याची. या सगळ्यांवर काहीही काम होत नाहीये. मूलभूत सुविधा ते पुढच्या ५० वर्षांचा विचार करून चिंचवडचा विकास व्हायला पाहिजे. शरद पवारांच्या व्हिजनमुळे चिंचवड वाकड विकासाची पायाभरणी केली. त्याला आता आपल्याला पुढे न्यायचं आहे. चिंचवडच्या सर्व भागांचा एकसारखा विकास व्हायला हवा!- राहुल कलाटे