अभिवादनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २६ जून २०२४ आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज हे थोर समाज सुधारक, शिक्षण प्रसारक, सर्वसामान्य जनतेचे लोकराजे होते. त्यांनी त्यांच्या राज्यकाळात अनेक दूरदर्शी निर्णय घेतले, सामाजिक एकोपा जपण्यासाठी, प्रचलीत रूढी परंपरांच्या विरुद्ध जाऊन दुरदर्शी निर्णय घेत परिवर्तनाची कास धरली, त्यांच्या व्यापक विचारांचा वारसा सर्वांनी जोपासला पाहिजे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस आणि केएसबी चौक चिंचवड येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
महापालिका भवनातील कार्यक्रमास उप आयुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, बालाजी अयंगार, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील, मिलिंद वेल्हाळ, सुनील पाटील, पी.डी.पाटील, कृष्णा पाटील, नामदेव शिंत्रे, विजय नाळे आदी उपस्थित होते.
केएसबी चौक चिंचवड येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा प्रांगणात झालेल्या अभिवादन कार्यक्रमास माजी महापौर मंगला कदम, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य मारुती भापकर, तुषार हिंगे, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, कार्यकारी अभियंता विजय जाधव, लक्ष्मीकांत कोल्हे, उप अभियंता विजय कांबळे, चंद्रकांत कुंभार, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गणेश फडतरे, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीस १५० वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने १५० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते रोपांचे वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात आज करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
महापालिकेच्या वतीने दोन दिवसीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते दि.२५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता संभाजीनगर चिंचवड येथील साईमंदिर उद्यान येथे संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपायुक्त अण्णा बोदडे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनातील महत्वपूर्ण प्रसंग सांगितले. त्यामध्ये सामाजिक विषमता दूर करणे, अंधश्रद्धा निर्मुलन करणे, सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे, पाण्याच्या व्यवस्थापनासाठी बंधारे बांधणे, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांना प्रोत्साहन देणे आदी महत्वपूर्ण घटनांची माहिती उपायुक्त बोदडे यांनी यावेळी दिली तसेच १० वी व १२ वी परीक्षेत उत्कृष्टरित्या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही त्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी यश मिळाल्यावर हुरळून न जाता गुणांचे व कामगिरीचे सातत्य टिकवून ठेवावे, तसेच अपयश मिळाल्यास खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले.
काल झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविणारा सलाम महाराष्ट्र हा कार्यक्रम कोल्हापूर येथील ज्ञानेश कोळी आणि त्यांच्या ५० सहकाऱ्यांनी सादर केला. यामध्ये भोपाली, वासुदेव, पिंगळा, शेतकरी व कोळी नृत्य, पारंपारिक लग्न सोहळा तसेच शिवकालीन संस्कृतीचा मागोवा घेणारा गायन, नृत्य आणि नाट्यांचा समावेश होता. आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिके व मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. रवींद्र जगदाळे, यांनी त्यांच्या सहका-यांसमवेत मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. तर साई उद्यान संभाजीनगर येथे शिवकालीन दुर्मिळ शस्त्रे तसेच दस्तऐवजांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले असून त्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!