महाराष्ट्र सरकार अनिल अंबानीचं १७०० कोटी रुपयांचं कर्ज माफ करत असेल तर माझे ही कर्ज सरकारनं माफ करावं- के. अभिजित
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १० जूलै २०२४ अनिल अंबानीचं १७०० कोटी रुपयांचं कर्ज महाराष्ट्र सरकार माफ करत असेल तर आम्हा सर्वसामान्य लोकांचं देखील थोडंफार कर्ज सरकारनं माफ करावं. या विषयाचा इमेल के. अभिजित यांनी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कर्जमाफीसाठी केला असल्याचे आमच्या प्रतिनिधीला सांगीतले.
या इमेल मधे ते लिहितात की आदरणीय मुख्यमंत्री,
महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
विषय: कर्ज माफी बाबत विनंती पत्र
आदरणीय महोदय, मी महाराष्ट्राचा नागरिक असून, सध्या मी एक सुशिक्षित बेकार व्यक्ती आहे. नुकतंच मला महायुती सरकारने श्री. अनिल अंबानी यांचे १७०० कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्याचं समजलं. तशा अनेक बातम्या माझ्या वाचण्यात ही आल्या. हा निर्णय ऐकून माझ्या मनात अनेक विचार निर्माण झाले आहेत आणि म्हणूनच मला आपल्याला हे पत्र लिहावं लागत आहे.
मी विनम्रपणे आपल्याला कळवू इच्छितो की, मी देखील कर्जाच्या भाराखाली दबलेला आहे. सुशिक्षित असूनही नोकरीच्या अभावामुळे मला माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत मला माझ्या कर्जाची परतफेड करणं अजिबात शक्य होत नाही. माझी आपल्याला विनंती आहे की, मी देखील महाराष्ट्राचा नागरिक आणि एक सुशिक्षित बेकार असल्यामुळे माझ्या कर्जाचा भार कमी करण्यासाठी आपले सहकार्य मिळावे.
जर श्री. अनिल अंबानी यांचे कर्ज माफ केलं जाऊ शकते, तर सामान्य नागरिकांच्या समस्यांवर देखील आपण लक्ष द्यावे अशी माझी विनंती आहे. त्यामुळेच मी माझ्या कर्जमाफीची विनंती आपल्याकडे सादर करीत आहे. आपली सहानुभूती मिळावी हीच माझी अपेक्षा आहे.
असे इमेल द्वारे मूख्यमंत्री व उपमूख्यमंत्री याना के. अभिजीत यांनी कळविले आहे. के. अभिजीत हे
चिखली, पिंपरी चिंचवड, पुणे येथिल रहिवाशी असून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.