गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका, पोलीस प्रशासन तसेच वीज वितरण अधिकारी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन…
पिंपरी चिंचवड दि. २८ ऑगस्ट २०२४ पिंपरी चिंचवड शहरात साजरा होणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सुविधांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आणि शहरातील विविध गणेशोत्सव मंडळे तसेच महानगरपालिका, पोलीस प्रशासन, वीज वितरण अधिकारी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांची संयुक्त बैठक उद्या गुरूवार २९ ऑगस्ट २०२४ रोजी ग. दि. माडगूळकर सभागृह, निगडी प्राधिकरण येथे दुपारी ४ वाजता संपन्न होणार आहे.
यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपुरक व शांततापूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी शहरातील सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी तसेच शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीस उपस्थित रहावे आणि आपल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
या बैठकीत महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवात विसर्जन मार्ग तसेच घाटांवर करण्यात येणाऱ्या सोयीसुविधा, गणेश मंडळांना देण्यात येणारा परवाना, उत्सव साजरा करण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना तसेच अटी, शर्ती, वीजवितरण कंपनीच्या वतीने शहरात विविध ठिकाणी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणारा बंदोबस्त आदींबाबत चर्चा करण्यात येणार आहे.