पत्रकार-महापालिका अधिकारी यांच्या साटेलोट्याची चौकशी व्हावी-अजय लोंढे

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. १९ मार्च २०२४ शहरातील काही पत्रकार व महापालिका अधिकारी यांच्यात साटेलोटे असून, ठराविक पत्रकारांनी शिफारस केलेल्या माध्यमातील प्रतिनिधींना महापालिकेतर्फे भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. तोंड बघून भेटवस्तू वाटप करणारे, भेटवस्तू वाटपातही भेदभाव करणारे ते पत्रकार आणि महानगर पालिका अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकृत हद्दीतील पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंपर्क व संबंधित जबाबदार विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व प्रकारचे वृत्त माध्यमे, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, दैनिक, या बरोबरीने न्यूज वेब पोर्टल, न्यूज चॅनेल, यांचे संपादक, वार्ताहार, प्रतिनिधी, फोटोग्राफर, तसेच वृत्त संकलनकर्ता व इतर यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने विशेष बाब व इतर बाबी अंतर्गत करण्यात आलेल्या नियोजनातून देण्यात आलेल्या भेटवस्तू सामग्री तरतूद तसेच वाटप यामधील अनियमितता याची सखोल चौकशी करून सर्व संबंधित प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जबाबदार दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई तात्काळ करावी, अशी मागणी लोकशाही संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, समाजसेवक अजय लोंढे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात लोंढे यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या ढिसाळ कारभारासंदर्भात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दोषी जबाबदार असणाऱ्या सर्व पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकृत अधिकारी ते कर्मचाऱ्यांकडून अति तात्काळ खुलासा मागून अनियमिततेला जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकृत अधिकारी कर्मचारी यांच्यावर किमान सहा महिने विनावेतन अति तात्काळ निलंबनाच्या कारवाईची तजवीज व्हावी.
तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या नोंदणी कृत व अनधिकृत सर्व वृत्त माध्यमे प्रिंट व इलेक्ट्रॉनिक यांच्या संपादक, वार्ताहार, प्रतिनिधी, फोटोग्राफर, व संबंधित सर्व घटकांची व अत्यावश्यक माहिती अति तातडीने संकलित करून विस्तृत वर्णनयुक्त यादी अति तात्काळ तयार करून सर्व संबंधित वृत्त, माध्यमे यांचे कार्य करणाऱ्या सर्व घटकातील घटकांना अति तातडीने साधनसामग्री, भेटवस्तू देणे संदर्भी विशेष बाब तरतूद करून भेटवस्तू साधनसामग्री यांचे अति तात्काळ विना विलंब विनाकारणाने तातडीने वाटप करण्यात यावे, अशीही मागणी लोंढे यांनी निवदेनाद्वारे केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जबाबदार संबंधित विभागांकडून सर्व वृत्त माध्यमे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक न्यूज मीडिया यांचे सर्व संबंधित जबाबदार घटक यांच्यासाठी करण्यात आलेल्या वस्तू साधने वाटपात तरतुदीत कोणत्या प्रकारे व कशाप्रकारे भ्रष्टाचार झाला आहे, याची सखोल चौकशी करण्यासाठी निःपक्षपाती अति तात्काळ समिती नेमून कार्यअहवाल तयार करण्यात यावा. अशीही मागणी करण्यात आली आहे.



