ईव्हीएमविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक..
रविवारी पिंपरी चौकात आंदोलन ; ईव्हीएम हटावसाठी होणार निषेध..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २९ नोव्हेंबर २०२४ राज्यात नुकत्याचा पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले बहुमत संशयास्पद आहे. त्यांच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड रोष असताना एवढे यश कसे प्राप्त झाले असा संशय राज्यातील नागरिकांमध्ये आहे. यासाठी ईव्हीएमवरील निवडणुक ही प्रक्रियाच चुकीची आहे, असे म्हणत पिंपरी-चिंचवड मधील संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. ईव्हीएमवरील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी ईव्हीएम हटाओ, असे निषेध आंदोलन पिंपरी-चिंचवड मधील संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येणार आहे. रविवारी (दि.१ डिसेंबर) दुपारी १२ वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, राज्यातील विधानसभा निवडणुकांचा धडाका नुकताच संपला आहे. या पुर्वी असणारे महायुतीचे सरकार पुन्हा बहुमतात सत्तेत आल्याचा निकाल लागला आहे. मात्र या निकालावर राज्यातील सर्वसामान्य जनता, विद्वान आणि काही उमेदवारही आक्षेप नोंदवत आहेत. निवडणुकीचा हा निकाल म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक असल्याचे चित्र आहे. त्याला कारणही तसेच आहे. शेतकऱ्यांना पुरक असे धोरण न राबविल्यामुळे बळीराजा नाराजीचा सूर ओढत आहे. आरक्षणावर ठोस मार्ग न काढल्यामुळे मराठा समाज, ओबीसी समाज प्रचंड नाराज आहे. महिलांवरील, चिमुकल्यांवरील अत्याचार थांबविण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे. या बरोबरच पुणेसारख्या शहरात कोयता गँगला आळा घालण्यात देखील राज्य सरकार कमी पडत आहे. यासह भ्रष्टाचाराने सरकारला पोखरलेले आहे. महायुतीच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. त्यांचे नेते महापुरूषांचे अपमान करून जनभावना दुखावत आहेत. त्यामुळे महायुतीविरोधात सर्वच जाती-धर्मातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता. असे असतानाही महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, ही बाब कोणालाही पटेना झाली आहे. अनेक उमेदवार लाखांच्या मतांनी निवडून येणे शक्य नाही. महायुती सरकार ईव्हीएमचे गौडबंगाल करून निवडणूका स्वतःच्या खिशात घालत आहे. हिंमत असेल तर त्यांनी पुर्वीप्रमाणे पेपरवर बॅलेट पेपरवर निवडणूकांना सामोरे जावे, असे आवाहन सतीश काळे यांनी केले. बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या, या मागणीसाठी तसेच ईव्हीएमच्या गैरकाराभवर आंदोलन करणार असल्याची माहिती सतीश काळे यांनी दिली. या आंदोलनात सर्वच लोकशाही मानणाऱ्या संस्था, संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन काळे यांनी केले आहे.