संभाजी ब्रिगेडच्या वतीने ईव्हीएमच्या विरोधात पिंपरीत आंदोलन..
ईव्हीएम विरोधात जनतेतून उठाव होईल..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०१ डिसेंबर २०२४ हक्काच्या बालेकिल्ल्यातही अनेक उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे. या निकालावर सर्वसामान्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. मात्र ही नाराजी सध्या सोशल मिडियातून व्यक्त होत आहे. मात्र नंतर जनतेतून मोठा उठाव होऊन ईव्हीएम हटविले जाईल,असा सूर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित आंदोलनातील विविध सामाजिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीने इव्हीएम विरोधात धरणे आंदोलन केले. या वेळी इव्हीएम हटवून मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या वेळी उपस्थित विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे माजी नगरसेवक मारुती भापकर मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, धम्मराज साळवे, शांताराम खुडे, रोहिनाज शेख, प्रदीप पवार, संजीवनी पुराणिक, सीपीएमचे सचिन देसाई, संतोष शिंदे, शरद थोरात आदींनी मनोगत व्यक्त केले. लोकशाहीमध्ये जनता सर्वश्रेष्ठ आहे. जनतेला अपेक्षित असलेले मुद्दे, शासकीय धोरणे राबविण्याबरोबरच जनताच या देशातील सत्तेत बसणाऱ्या लोकप्रतिनिधींचे भवितव्य ठरवत आहे. मात्र सत्तेचा गैरवापर करून जेंव्हा जनतेच्या हातातून अनेक गोष्टी घालविल्या जातात. तेव्हा जनतेमध्ये मोठा असंतोष निर्माण होतो.नागरिक योग्य सुशासन चालविण्यासाठी आणि सक्षम लोकशाही मुल्ये रुजविण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात. त्याच पद्धतीचा उठाव ईव्हीएमविरोधात होईल, असे सध्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांमध्येही हा रोष असून ईव्हीएम हटवून मतपत्रिकेवर आगामी निवडणूका घ्याव्यात. तसेच सध्या झालेल्या निकालावर योग्य चौकशी करावी, अशी मागणीही या आंदोलनात करण्यात आली.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते जिल्हा कार्याध्यक्ष लहुजी लांडगे शहराध्यक्ष सतीश काळे शहर कार्याध्यक्ष विशाल मिठे उपाध्यक्ष मुकेश बोबडे सचिव बाळासाहेब मुळे मराठा सेवा संघाचे वसंत पाटील, अनिल गाडे, गणेश देवराम, प्रकाश घोडके, सालार शेख, लहू अनारसे, प्रशांत चव्हाण, दिलीप कैतके, छावा संघटनेच्या शीतल मोरे, नरेंद्र पोटे, संजय गायकवाड, श्रीपती पाटील, जयंत गायकवाड, संजय भांगिदरे, विनोद ताटे, गजानन पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनाचे आयोजन सतिश काळे यांनी केले होते.