प्रतीनीधी सतिश पाटील मुलुंड मूंबई दि. ०२ डिसेंबर २०२४ मुंबईत पाच दिवस पाणी कपात केली जाणार असल्याचे मुंबई महापालिकेने सांगितले आहे. मुंबईकरांना पाच दिवस पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) १ ते ५ डिसेंबर या कालावधीत शहरात १० टक्के पाणी कपात लागू केली जाईल अशी घोषणा केली आहे.
मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टममध्ये ३० नोव्हेंबर रोजी बिघाड झाला आहे. या गेटच्या दुरुस्तीचे काम १ डिसेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत केले जाणार आहे. त्यामुळे ही पाणी कपात केली जाणार आहे, अशी माहिती मुंबई महानगर पालिकेने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेकडून होणार्या पाणी कपातीचा ठाणे आणि भिवंडी या महापालिकांनादेखील फटका बसणार आहे. १ डिसेंबर ते ५ डिसेंबर या काळात या महापालिकांमध्ये देखील १० टक्के पाणी कपात केली जाईल. या कालावधीत पाणी जपून वापरावे आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनदेखील महापालिकेच्या निवेदनात करण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात महापालिकेने १७ ते १८ ऑक्टोबर यादरम्यान मुंबईत ५ ते १० टक्के पाणी कपातीची घोषणा केली होती, यावेळी ठाणे जिल्ह्यातील पाईपलाईन वरील व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्याचे कारण सांगण्यात आले होते. मुंबई महापालिकेने निवेदन जारी करत वैतरणा पाईपलाईन वरील तराळी येथे ९०० एमएम व्हॉल्वमध्ये बिघाड झाल्याने पाणी पुरवठा तात्पुरता थांबवण्यात आल्याचे सांगितले होते. मुंबई शहर आणि उपनगर भागांना होणारा पाणी पुरवठा हा वैतरणा धरणातून केला जातो.
मुंबईत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे तरी सर्व नागरिकांनी पाणी कपातीला बाब लक्षात घेऊन पाणी गळती व पाणी जपून वापरावे अशी सुचना बृहन्मुंबई पालिकेतून करण्यात आली आहे. ५ डिसेंबर नंतर पाणी पुर्ववत होईल याची नोंद घ्यावी.