सक्षमा प्रकल्प ठरतोय महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे घेऊन जाणारा उपक्रम
जागृती महिला बचत गटाला ४२२ बॅग बनविण्यासाठी खरेदीचा आदेश
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०३ डिसेंबर २०२४ पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हस ट्रस्ट (टाटा स्ट्राइव्ह) या संस्थामध्ये 2023 मध्ये महिला स्वयंसहाय्यता गटाचे सक्षमीकरण करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. सदर करारामध्ये पुढील ०५ वर्षामध्ये ५००० स्वयंसहायता महिला गटांना (Self Help Group-SHG) सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये स्वयंसहायता महिला बचत गटांना “सक्षम” करणे हे महत्वाचे उद्दिष्ट असून यामध्ये बचत गटाचे सर्वेक्षण करणे, क्षमता बांधणी करणे, गटाचे पायाभूत सभासद प्रशिक्षण, आर्थिक साक्षरता, उद्योजकता विकास व नेतृत्व विकास यासारख्या आदी विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले आहे.
टाटा स्ट्राइव्ह व कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून गरजू विद्यार्थी व युवा वर्गाला व्यवसायभिमुख प्रशिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणापूर्वी वेलकम किटसुध्दा देण्यात येते. यामध्ये प्रशिक्षण साहित्य व बॅग यांचा समावेश सदर देण्यात येणाऱ्या किटमध्ये करण्यात येतो. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे किट यापूर्वी व्यावसायिक वर्ग किंवा पुरवठा दाराकडून घेण्यात येत होते. परंतू सक्षमा प्रकल्पाच्या माध्यमातून आता काही केंद्रासाठी तयार होणारे किट बनविण्यासाठी शहरातील महिला स्वयंसहायता गटांना सदरचे काम देण्यात येत आहे.
सक्षमा प्रकल्प ठरतोय महिलांना स्वावलंबी बनविणारे व्यासपीठ
सक्षमा प्रकल्पांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील ‘अ’ झोन मधील जागृती महिला बचत गटाला टाटा स्ट्राईव्हकडून ४२२ बॅगचे ऑर्डर नोव्हेंबर मध्ये मिळाली असून आत्तापर्यंत 63 बॅग पुर्ण केल्या असून उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. सक्षमा प्रकल्प महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि उपजीविका वाढवण्यासाठी सातत्याने कार्यरत असून महिलांना स्वावलंबी बनविण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. महापालिकेच्या समाजविकास विभागाकडून खरेदीचा आदेश देण्यात आला असून सहाय्यक आयुक्त नरळे यांनी, महिलांना बॅगबाबत गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी मार्गदर्शन करताना उत्पादनाच्या योग्य किंमतीचासुध्दा बचच गटांकडून विचार करावा लागेल. अशा शब्दात उत्पादनाबाबत महत्त्व समजावून सांगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे – पाटील, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे व समाज विकास विभाग व टाटा स्ट्राईव्ह टीम यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना आर्थिक आत्मनिर्भरतेची नवी संधी मिळाली असून स्वयं सहायता गटाच्या महिलांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांना उत्पन्न मिळू लागले असल्याने उपक्रमातील महिलांकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आभार मानले जात आहेत.