“राईट टू लव्ह” तर्फे महाराष्ट्र शासनाच्या आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी ‘सेफ हाऊस’ निर्णयाचे स्वागत..
प्रतिनिधी पुणे दि. २० डिसेंबर २०२४ महाराष्ट्र शासनाने समाजातील समता, सहिष्णुता, आणि प्रेमाला प्रोत्साहन देण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गेस्ट हाऊसला “सेफ होम (Safe Home)” म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा निर्णय आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षित निवास उपलब्ध करून देण्यासाठी क्रांतिकारी ठरणार आहे.
निर्णयाचे उद्दिष्ट:
:- समाजात समता व सहिष्णुतेचा प्रसार या निर्णयामुळे सामाजिक एकतेला चालना मिळेल.
:- प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण: अशा जोडप्यांना त्यांच्या सुरक्षेबाबतची भीती दूर करून सुरक्षित जीवन जगता येईल.
:- शांततामय निवास: जोडप्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात विश्वासाने आणि आनंदाने करता येईल.
महत्त्वाचे मुद्दे:
१) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गेस्ट हाऊस “सेफ होम” म्हणून घोषित करण्यात आले आहे.
२) विशेष कक्ष (Special Cell) स्थापन करून या जोडप्यांना मदत व मार्गदर्शन केले जाणार आहे.
३) विशेष कक्षामार्फत या सेफ होमच्या सुविधेबाबत सविस्तर माहिती दिली जाईल.
अनहद सोशल फाउंडेशनच्या “राईट टू लव्ह” उपक्रमाच्या वतीने, आम्ही महाराष्ट्र शासनाच्या या स्वागतार्ह निर्णयाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
फाउंडेशनचे मत आहे की, “हा निर्णय समाजातील समता व सहिष्णुतेचा पाया अधिक मजबूत करेल. अनेक जोडप्यांना त्यांच्या प्रेमाचा अधिकार निर्भयपणे बजावता येईल. शासनाच्या या पुढाकारामुळे प्रगत समाजाची उभारणी शक्य होईल.”
सर्व जोडप्यांना आवाहन:
जर तुम्ही आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केला आहे आणि तुम्हाला सुरक्षित निवासाची गरज आहे, तर या सेफ होम सुविधेचा लाभ घ्या.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील विशेष कक्ष (Special Cell) किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.