प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २० डिसेंबर २०२४ देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल जे विकृत आणि सडक्या मानसिकतेने अवमान कारक वक्तव्य केले, त्याच्या निषेधार्थ आज शुक्रवार दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी नागरी हक्क सुरक्षा समिती व पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक संघटनांच्या वतीने भाजप सरकारचा आणि अमित शहांचा निषेध करण्यात आला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये नागरी हक्क सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष मानव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निषेध आंदोलनामध्ये नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. ‘अमित शहा यांनी तमाम भारतीय जनतेची माफी तातडीने मागावी, अन्यथा नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावे’ अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात मार्गदर्शन करताना मानव कांबळे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना व भारतीय संविधानाला निर्मिती प्रक्रियेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध असल्याचे सांगून, ‘एका बहिष्कृत समाजातून आलेल्या व्यक्तीने लिहिलेले संविधान आम्हाला मान्य नाही’ अशी भूमिका संविधान निर्मितीच्या काळापासूनच हिंदुत्ववादी संघटना व त्यांच्या नेत्यांनी घेतलेली होती, असे सांगितले. “त्यांना या देशांमध्ये संविधान दूर करून मनुस्मृतीचे राज्य आणायचे आहे, आणि त्याच उद्देशाने वारंवार मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये संविधानाचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत, त्यामुळे तमाम संविधानवादी लोकांनी एकत्र येऊन या प्रवृत्तीचा मुकाबला केला पाहिजे” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
या आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मराठा सेवा संघाचे नेते प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, दीपक खैरनार, छावा युवा मराठा संघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, संजय जाधव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड गणेश दराडे, अपर्णा दराडे, कॉ. सचिन देसाई, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, गिरधारी लढ्ढा, दादाजी खैरनार, विजय माळी, दिलीप काकडे, संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे धम्मराज साळवे, विशाल जाधव, राष्ट्रीय काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे, संदेश नवले, राहुल शिंपले, अभिमन्यू दहिदुले, ॲड. गौतम कुडूक, ॲड. मिलिंद कांबळे, ॲड. अमिन शेख, ओबीसी महासंघाचे आनंदा कुदळे, सुरेश गायकवाड, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बाळासाहेब घस्ते, शिवशाही युवा संघटनेचे शिवशंकर उबाळे, सामाजिक कार्यकर्ते माऊली बोराटे, डॉ. पवन साळवे, अनिल सूर्यवंशी, वसंत साळवे, सतीश नायर, स्वाती कदम, श्रीमती मंगला मुनेश्वर, संजीवनी पुराणिक, गिरीश वाघमारे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.