प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २३ डिसेंबर २०२४ भारतीय राज्यघटनेला पंचाहत्तर वर्षे पुर्ण झाल्याने कॉंग्रेस पक्षासहीत इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी संसद मध्ये सरकारकडे राज्यघटनेवर चर्चेची मागणी केली. अदानी, मणीपूर राज्यातील परीस्थिती, संभल मंदिर विवाद (उत्तर प्रदेश) या विषयांवर सभागृहात चर्चेची मागणी सातत्याने फेटाळल्यानंतर राज्य घटनेवर विरोधाकांची मागणी सरकार वतीने मान्य करण्यात आली. यावेळी इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी सरकारला लोकशाही, संवैधानिक मुल्याशी बांधिलकीची आठवण करून दिली. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता, न्याय हे आदर्श जपण्याचा सल्ला भाजपला आवडला नाही. या विषयावर बोलताना गृहमंत्री श्री.अमित शहा यांनी संसद भवन मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अवमानकारक शब्द वापरले. भाजपा व त्यांच्या विचारांचे लोक, संस्था या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राज्यघटना याच्या विरोधात नेहमीच राहीलेली आहे.
या विरोधात काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडी घटकपक्षांनी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्याकडे गृहमंत्री श्री. अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली असता नेहमी सारखीच त्यांनी या संवेदनशील विषयास बगल दिली, तसेच संसदेचे चालू अधिवेशन रोखून धरले. सदर मागणीचे आंदोलन करत असताना कॉंग्रेस खासदारांशी झटापट झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री. मल्लीकार्जुन खर्गे यांना डावलण्यात आले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात गंभीर कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला.
याचा निषेध व राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, याबाबतचा ठराव दि. १५/१२/२०२४ रोजी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते संमत करण्यात आला.