आंदोलनमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

पालकमंत्री पद न देता धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळातून बरखास्‍त करा..

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतिश काळे यांची मागणी.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ डिसेंबर २०२४ बीडमध्ये कायदा सुवस्‍थेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे जातीय सामाजिक सलोखा राखण्यात आणि कायदा सुव्‍यवस्‍था अबाधित ठेवण्यात तिथले लोकप्रतिनिधी राज्‍याचे मंत्री धनंजय मुंडे अपयशी ठरले आहेत. नुकताच मस्‍साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्‍या हत्‍येमध्ये मंत्री मुंडे समर्थक असल्‍याची चर्चा होत आहे. त्‍यामुळे या प्रकरणाचा पुर्ण छडा लागत नाही, तो पर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद देऊ नये. तसेच त्‍यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे पिंपरी चिंचवड समन्‍वयक सतिश काळे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्‍या निवेदनात ही मागणी करण्यात आली.
काळे यांनी दिलेल्‍या निवेदनात नमूद केले आहे की बीड जिल्‍ह्यात कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. स्‍थानिक लोकप्रतिनिधींच्‍या भूमिका त्‍याला अधिक खतपाणी घालत आहेत की काय असा प्रश्‍न उपस्‍थित होत आहे. नुकतेच बीड जिल्‍ह्‍यातील मस्‍साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घुण पद्धतीने खून करण्यात आला. यामध्ये काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील मास्‍टरमाईंड म्‍हणून परळीचे माजी नगराध्यक्ष वाल्‍मिक कराड यांचे नाव पुढे येत आहे. अनेकांनी त्‍यांच्‍या नावाचा उल्‍लेख करत अटक करण्याची मागणी करत आहेत. मात्र त्‍यांना अटक होताना दिसत नाही. कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्‍या अत्‍यंत जवळचे निष्ठावान कार्यकर्ते असल्‍याचे बोलते जाते. त्‍यांचा वरदहस्‍त असल्‍यानेच वाल्मिक कराड अटकेत नसल्‍याची चर्चा आहे. कराड माझ्या जवळचे आहेत, असे वक्‍तव्‍य करून मंत्री मुंडे देखील या प्रकरणाबाबत गंभीर नसल्‍याचे चित्र आहे.
मुख्य मास्‍टरमाईंड अटकेत नसल्‍याने बीड जिल्‍ह्‍यातील लाखो नागरिक, महाराष्ट्रातील जनतेत प्रचंड नाराजीचा सूर आहे. सध्या मंत्रीपदाचे वाटप झाले. त्‍यामध्ये धनंजय मुंडे यांचा मंत्रीमंडळात सहभाग नको, अशी मागणी अनेक नागरिकांनी केली. त्‍याकडे सत्‍ताधारी महायुतीने दुर्लक्ष केले आहे. आता जिल्‍ह्‍याचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना मिळण्याची शक्‍यता आहे. तसे झाले तर सर्वसामान्‍य नागरिकांमध्ये महायुतीबाबत प्रचंड नाराजीचा सूर उफाळून येईल त्‍यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्री न करता त्‍यांची मंत्रीमंडळातूनच हकालपट्टी करावी अशी मागणी काळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनावर सतीश काळे, भाऊसाहेब ढोरे, विशाल मिठे, गणेश दहिभाते, नकुल भोईर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!